News Flash

सुशीलकुमार शिंदे यांची काँग्रेस सरचिटणीसपदावरून उचलबांगडी

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची अ. भा. काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदावरून मुक्तता करण्यात आली.

सुशीलकुमार शिंदे

रजनी पाटील हिमाचलच्या प्रभारी

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची अ. भा. काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदावरून मुक्तता करण्यात आली. शिंदे यांचे सरचिटणीसपद गेल्याने राज्यातील मुकूल वासनिक हे नव्या रचनेत सरचिटणीसपदी कायम राहतील, अशी चिन्हे आहेत.

गेल्या वर्षीच सुशीलकुमार शिंदे यांची अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी करण्यात आलेल्या फेररचनेत हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदी माजी खासदार रजनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबरोबरच सरचिटणीस व हिमाचलचे प्रभारी म्हणून शिंदे यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. पक्षाच्या वेबसाइटवरून सरचिटणीसपदांच्या यादीतून शिंदे यांचे नाव आणि छायाचित्र काढण्यात आले. सध्या शिंदे यांच्याबरोबरच मुकूल वासनिक आणि अविनाश पांडे हे सरचिटणीसपदावर होते. यापैकी शिंदे यांना सरचिटणीसपदावरून मुक्त करण्यात आले. शिंदे यांचे पद गेल्याने दलित समाजातील वासनिक हे नव्या रचनेत कायम राहतील, असा अंदाज बांधला जात आहे. अविनाश पांडे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये मानले जातात. महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्याकडे गुजरात तर रजनी पाटील यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या महिन्यात राज्यसभा निवडणुकीत रजनी पाटील यांना पुन्हा उमेदवारी नाकारण्यात आली होती. तेव्हा नाराज झालेल्या रजनी पाटील यांना माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल, असे आश्वासन दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 3:54 am

Web Title: sushil kumar shinde to step down as congress general secretary post
Next Stories
1 शासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी कंत्राटी अधिकारी
2 महाराष्ट्रात प्रथमच कासवांवर ‘मायक्रोचिपिंग’ प्रयोग
3 अकरावीच्या साडेनऊ हजार जागा वाढणार
Just Now!
X