‘रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा वेडा मुख्यमंत्री’ असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बुधवारी काढले; तर दिल्लीतील मुख्यमंत्री हे वेडेपणाची निवड असल्याचे काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
पोलिसांच्या निलंबनाच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी दोन दिवसांचे धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मंत्री हे दिशा मार्गदर्शन नसलेले क्षेपणास्र आहे, तसेच ते घटनात्मक जबाबदारी सांभाळत असल्यामुळे त्यांनी जबाबदारीने वागावे, असे भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी सुनावले. आपचे हे आंदोलन स्वीकारार्ह नाही, त्याचा लोकसभा निवडणुकीसाठी कोणताही फायदा होणार नसल्याचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
हिंगोलीतील एका जाहीर सभेत शिंदे म्हणाले की, आपणही पोलीस खात्यात होतो, तेव्हा काही दिवसांपूर्वीच आपला विवाह झाला होता. खेरवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना त्या परिसरात दंगल उसळल्याने आपली सुट्टीही रद्द करण्यात आली होती. आता एक मूर्ख मुख्यमंत्री धरणे आंदोलनासाठी बसला असल्याने आपल्याला दिल्ली पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द कराव्या लागल्या, असे शिंदे म्हणाले.
केजरीवाल हे कायद्याचा सन्मान करीत नसल्याची टीका कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केली आहे. धरणे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही,असे सांगणाऱ्या केजरीवाल यांनी पक्षाचे योगेंद्र यादव यांना वाटाघाटी करण्यासाठी नायब राज्यपालांकडे पाठवून आपले आंदोलन संपवल्याची टीकाही सिंग यांनी केली, तर लोकांचे लक्ष इतर मुद्दय़ांकडून दुसरीकडे वळवण्यासाठीच केजरीवाल यांनी आंदोलनाचे नाटक केल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते संदीप दीक्षित यांनी म्हटले आहे.