– संदीप आचार्य

दादरच्या सुश्रूषा रुग्णालयातील डॉक्टर व दोन परिचारिकांना करोनाची लागण झाल्यानंतर पालिकेने रुग्णालय सील केले. मात्र येथे डायलिसिस करणाऱ्या ८५ रुग्णांना सेवा मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने अहोरात्र काम करून निर्जंतुकीकरण पूर्ण केल्यामुळे उद्यापासून येथील डायलिसिस सेवा पुन्हा सुरू होईल, असे चित्र आहे. परंतु, परिचारिंकासह ७० जणांची करोना चाचणी अद्याप झाली नसून ती जबाबदारी सुश्रूषा रुग्णालयाची असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
mumbai accident, mumbai accident 2 died
मुंबई: हेल्मेटशिवाय दुचाकीवरून तिघांची सफर जीवावर बेतली; दोघांचा मृत्यू, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी

सुश्रूषा रुग्णालय हे दादर परिसरातील सर्वसामान्यांना परवडणारे एक चांगले रुग्णालय. १३२ खाटा असलेल्या या रुग्णालयात एका डॉक्टरला व दोन परिचारिकांना करोनाची लागण झाल्याचे आढळून येताच चार एप्रिलपासून पालिकेने येथील कर्मचाऱ्यांची तात्काळ करोना चाचणी केली खरी, परंतु चाचणीचे रिपोर्ट नऊ एप्रिलला रुग्णालय प्रशासनाने थेट आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर मिळाले.

दरम्यानच्या काळात येथील ३० परिचारिका व अन्य कर्मचारी मिळून जवळपास ७० जणांना धारावीतील राजीव गांधी सेंटरमध्ये दोन दिवसांपासून ठेवण्यात आले असून या परिचारिका व कर्मचाऱ्यांची अद्यापी चाचणीही करण्यात आलेली नाही. काल रात्री पुलावसारखा दिसणारा भात आम्हाला जेवण म्हणून देण्यात आला तर ७० जणांसाठी एकच टॉयलेट असून जमिनीवर गाद्या टाकून आमच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे या परिचारिकांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

आमची किमान तातडीने करोना चाचणी करावी अशी या परिचारिकांची मागणी असून याबाबत पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना विचारले असता ते म्हणाले की, आता या परिचारिकांची चाचणी करण्याची जबाबदारी सुश्रूषा रुग्णालयाची आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात रुग्णालयात जाऊन आवश्यक चाचण्या केल्या होत्या. आता कोणतीही लक्षणे नसलेल्या व विलगीकरणाखाली असलेल्या या परिचारिकांची चाचणी करण्याची जबाबदारी ही संबंधित रुग्णालय प्रशासनाची आहे. तसेच या ७० कर्मचार्यांना आजच रुपारेल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये हलविण्यात येऊन तेथे अधिक चांगली व्यवस्था केली जाईल, असे दिघावकर यांनी सांगितले. या परिचारिकांची चाचणीबाबत योग्य ती काळजी घेतली जाईल, असे सुश्रूषाच्या अधिष्ठात्री डॉ शिल्पा देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान सुश्रूषा रुग्णालय बंद केल्यामुळे तेथे डायलिसीस सेवा घेणाऱ्या ८५ रुग्णांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना डायलिसीस सेवा कोणत्याही परिस्थितीत मिळणे गरजेचे होते तसेच एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या या रुग्णांची व्यवस्था अन्य रुग्णालयात होणे शक्य नव्हते हे लक्षात घेऊन येथील अधिष्ठात्री डॉ शिल्पा देशमुख व डॉ व्होरा यांनी पालिका प्रशासनाला याची संपूर्ण कल्पना देऊन तातडीने रुग्णालयातील अन्य कर्मचारी वर्ग रुग्णालयाबाहेर हलवला. तसेच तिसरा मजला जेथे ही डायलिसीस सुविधा आहे तेथील संपूर्ण निर्जंतुकीकरण करून घेतले. डायलिसीसच्या रुग्णांना लागणारी औषधे तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास लागणारी अतिदक्षता सेवा तसेच अत्यावश्यक डॉक्टर, तंत्रज्ञ आदींची व्यवस्था गेले चार दिवस अहोरात्र झटून आम्ही केल्याचे डॉ शिल्पा देशमुख यांनी सांगितले. या रुग्णांसाठीचे सर्व प्रोटोकॉल पूर्ण झाले असून उद्यापासून ८५ रुग्णांची डायलिसिस सेवा पूर्ववत सुरळीत होऊ शकेल असा विश्वास डॉ देशमुख यांनी व्यक्त केला. पालिकेचे डॉक्टर तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी केलेले वेगवान सहकार्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. डायलिसिस सेवा सुरु व्हावी यासाठी गेले चार दिवस अहोरात्र एक केल्याचे डॉ देशमुख यांनी सांगितले.

मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना आठवड्यातून तीन ते चार वेळा डायलिसिस करावेच लागते. ही सेवा खंडित झाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील ज्या रुग्णालयात डायलिसिस सेवा दिली जाते त्यांच्यापुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयात करोनाचा संसर्ग झाल्यास संपूर्ण रुग्णालय सील केले जाते. अशावेळी डायलिसिस सेवा असणार्या रुग्णालयांसाठी स्वतंत्र प्रोटोकॉल तयार केला जावा व तेथे तात्काळ निर्जंतुकीकरण करून ही सेवा कशी लवकरात लवकर सुरू होईल याची काळजी घेतली जावी, असे हिंदुजा रुग्णालयातील नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ अॅलन अल्मेडा यांनी सांगितले. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही याबाबत अलीकडेच मुंबईतील नेफ्रॉलॉजी डॉक्टरांची एक बैठक घेतली होती. संपूर्ण मुंबईत आज मूत्रपिंड विकाराच्या काही हजार रुग्णांना डायलिसिस सेवा दिली जाते. ही सेवा कोणत्याही कारणाने बंद झाली तर या रुग्णांची गाठ जीवाशिवाशी पडणार हे लक्षात घेऊन डायलिसिस सेवा योग्य प्रकारे सुरुच राहिली पाहिजे असे नेफ्रॉलॉजीस्ट डॉ उमेश खन्ना यांनी सांगितले.

शरद पवारांचा फोन

सुश्रूषा रुग्णालयातील काही डायलिसिसच्या रुग्णांनी दादरमधील मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना संपर्क साधून डायलिसिस सेवा लवकरच सुरळीत व्हावी अशी विनंती केली. देशपांडे यांनीही हा विषय पालिका प्रशासनाकडे व सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला दूरध्वनी करून नेमकी अडचण समजून घेतली व पालिका आयुक्तांना फोन करून सुश्रूषातील डायलिसिस सेवा लवकर सुरु करण्यासाठी मदत करण्याच्या सूचना दिल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.