लोकल ट्रेनमधील अमेरिकन तरुणी मिशेल मार्क्‍स हिच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री ग्रँट रोड येथून संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. हा संशयित तोच हल्लेखोर असण्याची शक्यता असून फिर्यादीने ओळख पटविल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल,  असे पोलिसांनी सांगितले.
अमेरिकन तरुणी मिशेल मार्क्‍स (२४) हिच्यावर रविवारी मरिन लाईन्स आणि चर्नी रोड रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये हल्ला झाला होता. रेल्वे पोलिसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी सहा पथके तयार केली आहेत.
बुधवारीही पोलिसांनी दहा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यातून हल्लेखोराबाबत पोलिसांना ठोस माहिती मिळाली असून बुधवारी संध्याकाळी ग्रँट रोड येथे सापळा लावला होता. रात्री उशिरा तो संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकृतपणे त्याबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र जर फिर्यादीने त्याची ओळख पटवली तर हा तोच हल्लेखोर असल्याचे निष्पन्न होईल असे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप बिजवे यांनी सांगितले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, मिशेलने स्वत:चा वकील नेमला असून वकिलामार्फत ती पोलिसांशी संवाद साधत आहे.