इस्लामिक स्टेट अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करीत असल्याच्या संशयावरून मुंब्र्यातून गुरुवारी रात्री एका तरुणाला अटक करण्यात आली. ठाण्यातील दहशतवाविरोधी पथकाने ही कारवाई केली. या तरुणाला एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, आयसिससाठी काम करीत असल्याच्या संशयावरून देशभरात विविध ठिकाणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी सहा जणांना कर्नाटकातून, चौघांना हैदराबादमधून आणि दोघांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. ठाण्याजवळील मुंब्र्यातून एका तरुणाला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर ठाण्यातील दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली.
काही महिन्यांपूर्वीच मालवणीमधील तीन युवक आयसिसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी एक जण सीरियाला गेल्याचीही माहिती होती. इतर दोन जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली होती. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले होते.