मुंबई : शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असताना पोलिसांच्या गणवेशातील एका व्यक्तीने पक्ष्याची शिकार केल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. पाणथळ जागांवरील पक्षी, जंगलांमधील प्राणी, इत्यादी वन्यजीवांना विविध कायद्यांतर्गत संरक्षित करून त्यांची शिकार हा कायदेशीर गुन्हा आहे.

प्राण्यांच्या शिकारीबाबत समाजमाध्यमांवर काही माहिती प्रसारित होत असल्यास त्यावर ‘अम्मा के अर फाऊंडेशन पॉज मुंबई’ या संस्थेचे सदस्य लक्ष ठेवून असतात. एका व्यक्तीचे छायाचित्र संस्थेच्या सदस्यांना आढळले. या व्यक्तीच्या एका हातात बंदूक तर दुसऱ्या हातात एक पक्षी आहे. त्याच व्यक्तीची पोलीस गणवेशातील दोन छायाचित्रेही प्रसारित झाली आहेत. छायाचित्रांसोबत त्या व्यक्तीचे नाव आणि ही व्यक्ती शिरकी-पेण येथे प्राण्यांची शिकार करत असल्याचे मजकूर आहे. छायाचित्रात दिसत असलेला पक्षी हा पाणथळ जमिनीवर आढळणारा आहे. या प्रकाराबाबत मानद वन्यजीव रक्षक सुनीष सुब्रमण्यम् यांनी वनविभागाला पत्र लिहिले आहे.

‘छायाचित्रातील पोलीस शिपायाचा शोध लागलेला नाही. तो नायगाव पोलीस ठाण्यात असल्यास हे प्रकरण ठाणे वनविभागाकडे दिले जाईल’, असे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी सांगितले. ‘छायाचित्रातील पोलीस शिपाई सापडल्यानंतर त्यास चौकशीसाठी बोलावले जाईल. घटना नेमकी कु ठे घडली हे चौकशी अंती स्पष्ट होईल’, असे वनपरिक्षेत्र अधिकारी कु लदीप पाटकर यांनी सांगितले.