आमदारांनी मारहाण केलेले निलंबित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी हे विधानसभेने नेमलेल्या समितीसमोर साक्ष देण्यासाठी सोमवारी मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत वाहनातून विधान भवनात आल्याने आमदार मंडळींच्या भुवया साहजिकच उंचावल्या. या घटनेची गांभीर्याने दखल घेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
सूर्यवंशी यांना झालेली मारहाण तसेच पाच आमदारांचे निलंबन या सर्वाची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसमोर आ. राम कदम आणि क्षितीज ठाकूर, सूर्यवंशी, विधान भवनाचे सुरक्षा अधिकारी शिवाजी बोडखे, सीसीटीव्ही बसविणारा ठेकेदार यांच्या साक्षी नोंदवून घेण्यात आल्या. मंगळवारी उर्वरित तीन निलंबित आमदारांच्या साक्षी होतील. साक्षीसाठी सूर्यवंशी वाहतूक विभागाच्या वाहनातून (एम.एच. ०१ झेडए ९१५) एका निरीक्षकाबरोबर आले होते. निलंबित करण्यात आलेल्या सूर्यवंशी यांना अधिकृत वाहनातून येण्यास वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच कशी, असा आमदारांचा सवाल होता.
मारहाणीच्या घटनेपासून वरिष्ठ अधिकारी सूर्यवंशी यांच्या पाठीशी ठाम उभे राहिल्याने आमदारांमध्ये नाराजी होती. यातूनच आमदार विरुद्ध पोलीस, असा संघर्ष झाला होता. आमदारांच्या मागणीनंतर सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले.
समितीसमोर सूर्यवंशी यांची साक्ष झाली. त्यांनी झालेला सारा प्रकार कथन केला. सूर्यवंशी यांनी सारा दोष आमदारांनाच दिल्याचे समजते. साक्ष झाल्यावर विधान भवनाच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना टाळण्याकरिता सूर्यवंशी यांना मुख्यमंत्री ये-जा करतात त्या दरवाजातून बाहेर नेले. येताना पोलीस वाहनातून आलेले सूर्यवंशी जाताना मात्र टॅक्सीतून चेहरा लपवतच गेले. साक्ष देताना कोणती उत्तरे द्यायची याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूर्यवंशी यांना पढविल्याचा संशय आमदारमंडळींकडून व्यक्त केला जात होता.
काही आमदारांनी याबाबत अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे लक्ष वेधले. पाटील यांनी सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसळकर यांना झाल्या प्रकाराबद्दल जाब विचारल्याचे सांगण्यात आले. मुंबई वाहतूक पोलिसांच्या या वर्तणुकीबद्दल गृहमंत्री संतप्त झाले होते.