सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणारे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन बुधवारी मागे घेण्यात आले. निलंबन मागे घेण्याबाबत ठराव सभागृहात मंजूर करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परिचारक यांच्या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला असून यामध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली होती.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने प्रशांत परिचारक यांच्या वादग्रस्त विधानाबाबत आज विधान परिषदेत अहवाल सादर केला. दीड वर्षांसाठी परिचारक यांचे निलंबन करण्यात आले होते.

दीड वर्षांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणूकांच्या प्रचारादरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील भोसे येथे उमेदवाराच्या प्रचार सभेत, विरोधकांवर टीका करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत परिचारक यांनी संतापजनक शब्दांत अपमानास्पद वक्तव्य केले होते.

‘पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना टीकेला समोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेतून दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.