नशेबाजीसाठी पुलाच्या सांध्यांच्या नटबोल्टची विक्री केल्याचा संशय

अमर महलचा जुना उड्डाणपूल खिळखिळा होण्याला गर्दुल्ले कारणीभूत असल्याचा संशय सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. पुलाच्या सांध्यांना जोडणारे नटबोल्ट काढून गर्दुल्ले नशेचा खर्च भागवत. त्यामुळे ७० कोटी रुपये खर्च करून विभागाला नवा पूल बांधावा लागला. भविष्यात नव्या पुलाला धोका निर्माण होऊ नये यासाठी पुलाखालील मोकळ्या जागेत टिळकनगर पोलिसांना चौकीसाठी जागा देण्याचा विचार विभागाकडून सुरू आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने १९९५मध्ये अमर महल उड्डाणपूल उभारला. लोखंडी सांध्यांवर उभारलेला मुंबईतला हा पहिला पूल होता. ४ एप्रिल २०१७ रोजी पुलाच्या साध्यांना जोडणारा एक मोठा नटबोल्ट रस्त्यावर पडलेला एका प्रवाशाला दिसला आणि त्याने ही बाब तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली. विभागाने पुलाची पाहणी केली तेव्हा पाच ते सहा सांध्यांतील नटबोल्ट नाहीसे झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. नियमितपणे डागडुजी न झाल्याने हे नटबोल्ट निखळले असावेत, असा अंदाज त्या वेळी विभागाने बांधला. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विभागाने जुना पूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय घेतला. ७१ कोटी रुपये खर्चून विभागाने दीड वर्षांत नवा पूल बांधला.

दरम्यान, नव्या पुलाचे बांधकाम सुरू असताना बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सामानाची मोठय़ा प्रमाणात चोरी होऊ लागली. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली. तरीही काही गर्दुल्ले सुरक्षारक्षकांवर दादागिरी करून लोखंडी सामान चोरत होते. याबाबत कंत्राटदार कंपनीने टिळकनगर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारीही केल्या होत्या. २ एप्रिल रोजी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार गर्दुल्ल्यांपैकी एकाला सुरक्षारक्षकांनी पकडून बेदम मारहाण केली. त्यात वेलजी मारु (४०) याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी चार सुरक्षारक्षकांना अटकही केली. या घटनेनंतरही चोऱ्या थांबल्या नव्हत्या. त्यानंतरही अनेकदा लाखो रुपयांचे भंगार चोरीला गेले. उड्डाणपुलाखाली अनेक कुटुंब राहतात. त्यांच्याकडून येथील लोखंडी सामानाची चोरी होत होती. त्यांना हटकल्यास चाकूचा किंवा अन्य शस्त्रांचा धाक दाखवीत, अशी माहिती एका सुरक्षारक्षकाने ‘लोकसत्ता’ला दिली.

जुना पूल गर्दुल्ल्यांनी खिळखिळा केला असावा, असा संशय आहे. भविष्यात पुलाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथील मोकळ्या जागेत लोखंडी जाळी बसविण्यात येणार आहे. तसेच वाहतूक पोलीस आणि टिळकनगर पोलिसांसाठी चौकी उभारणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

१०० रुपयांत विक्री

जुन्या पुलाचे सुमारे चार-पाच किलो वजनाचे लोखंडी नटबोल्ट गर्दुल्ल्यांनी १००-१५० रुपयांना भंगारात विकले असावेत. त्यातून नशेचा खर्च भागवला असावा. नव्या पुलाचे बांधकाम सुरू असतानाही अशाच प्रकारे गर्दुल्ल्यांकडून चोरीच्या अनेक तक्रारी बांधकाम विभागाचा कंत्राटदार आणि पोलिसांकडे आल्या होत्या.

पुलाच्या बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सामानाच्या चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. पुलाखाली चौकी उभारल्यास गर्दुल्ल्यांचा वावर थांबेल.

– सुशील कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टिळकनगर