राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला पाठिंबा का दिला?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीला दिलेल्या लेखी उत्तरात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पक्षनेतृत्वाची म्हणजे खासदार राजू शेट्टी यांचीच खरमरीत उलटतपासणी घेतली आहे. खासदार, आमदारांच्या वेतनवाढीला विरोध होता, तर त्याचा लाभ का घेतला, भाजपने फसवणूक केली, असे मत झाले असेल, तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा का दिला, जिल्हा परिषदेत भाजपशी हातमिळवणी करून, काही पदे पदरात पाडून का घेतली, अशा प्रश्नांची सरबत्तीच खोत यांनी पक्षनेतृत्वावर केली आहे.

भाजपबरोबर युती करून लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. मात्र अलीकडे खोत व पक्षनेतृत्व यांच्यात खटके उडू लागले. सदाभाऊ खोत भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खोत यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. समितीने त्यांना त्यांच्यावरील काही आक्षेप लेखी स्वरूपात पाठविले. खोत यांनी त्याला लेखीच उत्तर दिले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन न पाळता आम्हाला ते शक्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वतीने लिहून दिले. ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची भाजप सरकारने केलेली फसवणूक आहे की नाही, यावर आपले मत काय, असा प्रश्न समितीने विचारला आहे. त्यावर हा प्रश्न राज्य सरकारच्या नव्हे तर, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे, त्यासाठी पक्षाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवावा, संसदेत आवाज उठवावा, असे उत्तर देऊन खोत यांनी खासदार असलेल्या राजू शेट्टी यांच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे.  शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकाला सत्तेवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले प्रयत्न चुकीचे होते, असे वाटू लागल्याने राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढली, ती योग्य होती की, राजू शेट्टी यांची केवळ आत्मप्रौढीसाठी नौटंकी होती, यावर आपले मत काय, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे. भाजप सरकारने फसवणूक केली असे वाटत असेल तर, आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला पाठिंबा का दिला, त्या बदल्यात समाजकल्याण महिला सभापतीपद का मिळविले, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला, असे पलटवार उत्तरादाखल खोत यांनी पक्षानेतृत्वावरच केले आहेत.

भाजपची सत्ता आल्यानंतर मंत्री व आमदारांचे पगार वाढविले. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करीत असताना विधानसभेतील सर्व पक्षांच्या आमदारांनी एकमताने पगारवाढविण्यास संमती दिली, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून हे आपणास योग्य वाटते का, या प्रश्नालाही सदाभाऊ खोत यांनी चोख उत्तर दिले आहे. आपल्याकडून तशा सूचना आल्या असत्या तर मी आमदार व मंत्र्यांच्या पगरवाढीला विरोध केला असता. मात्र त्या आधी केंद्र सरकारने खासदारांचे वेतन वाढविले होते. त्यावेळी खासदारसाहेबांनी आपले वाढलेले वेतन केंद्र सरकारकडे जमा केले असल्यास, त्याविषयीची माहिती कळविल्यास मीही माझे वाढलेले वेतन राज्य सरकारकडे जमा करीन. एका बाजूला वेतनवाढीला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा लाभही घ्यायचा, ही दुटप्पी भूमिका योग्य वाटत नाही, असा टोलाही खोत यांनी लगावला.