देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशात एक नवा वाद निर्माण झाला. रिहानाने ट्विट करताच गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर एक शब्दही न उच्चारणारे सेलिब्रिटी ट्विटरवर व्यक्त होऊ लागले. विशेष म्हणजे अक्षय कुमार आणि सायना नेहवालचं ट्विट सेम असल्याने अनेकांच्या तर भुवया उंचावल्या. ट्विट करणाऱ्यांमधील एका नावाने सर्वांना आश्चर्यचकित केलं ते म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनने ट्विट केलं आणि त्याच्यावर सोशल मीडियावरुन टीकेचा भडीमार सुरु झाला. यामुळे त्याच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनदेखील होऊ लागलं आहे.
सचिन तेंडुलकरच्या मुंबईमधील घराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निदर्शन करण्यात आलं. यावेळी सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील, असा सवाल विचारण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजीत बागल यांनी हे आंदोलन केलं. यावेळी त्यांनी हातात फलक घेऊन सचिनला विचारणा केली.
सचिनने ट्विटमध्ये काय म्हटलं आहे –
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केलं होतं. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅग वापरले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2021 6:39 pm