दुर्लक्ष करणाऱ्या मध्य रेल्वेला रेल्वेमंत्र्यांनी खडसावले

हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या रुळांजवळ असणारा कचरा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्याच्या सफाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या मध्य रेल्वेला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी चांगलेच खडसावले. हार्बरवरील वडाळा, कुर्ला आणि जीटीबी नगर या तीन स्थानकांच्या रुळांजवळ मोठय़ा प्रमाणात कचरा येत असून त्वरित सफाई अभियान चालवा, असे आदेशच दिले आहेत. त्यामुळे धाबे दणाणलेल्या मध्य रेल्वेने त्वरित सफाई अभियान चालविल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील स्थानकांच्या रुळांवर मोठय़ा प्रमाणात कचरा येतो. रुळांजवळ असणाऱ्या झोपडय़ा किंवा चाळींमधून कचरा टाकतानाच त्यामध्ये प्लास्टिकचाही समावेश असतो. त्यामुळे पावसाळ्यात याच कचऱ्यामुळे रुळांवर पाणी साचून लोकल गाडय़ा विस्कळीत होतात. हार्बर मार्गावरील रुळांजवळ मोठय़ा प्रमाणात कचरा येत असतो. येणाऱ्या कचऱ्यामुळे दरुगधी तर पसरतेच शिवाय रूळ गंजण्यासही कारणीभूत ठरते. पावसाळ्यापूर्वी रुळांवर आणि त्याच्या हद्दीत असणारा कचरा उचलण्यात येत असल्याचा दावाही केला जातो. परंतु हा दावा पावसाळ्यात फोल ठरतो. कचरा उचलण्यासाठी मध्य रेल्वेकडून मध्यरात्रीच्या वेळी चार लोकलगाडय़ाही चालविण्यात येतात आणि सफाई करून कचरा या लोकल गाडय़ांमधून नेला जातो. हार्बरवरील वडाळा, कुर्ला आणि जीटीबी नगर स्थानकांच्या रुळांवर आणि हद्दीत तर मोठय़ा प्रमाणात कचरा येत असतानाही तेथील सफाईकडे मध्य रेल्वेकडून दुर्लक्ष केले जात होते.

आदेश येताच सफाई

गेल्या काही महिन्यात  हार्बरवरील वडाळा, कुर्ला आणि जीटीबी नगर स्थानकांदरम्यान सफाई व्यवस्थित होत नसल्याची तक्रार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आली. ही तक्रार येताच तात्काळ गोयल यांनी शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेला सफाई करण्याचे आदेश दिले.हे आदेश येताच मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. दुपारी आदेश येताच मध्य रेल्वेकडून त्वरित कामगारांना पाठवून सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची माहिती रेल्वेमंत्री यांनी मागविल्याचे सूत्रांनी सांगितले.

हार्बरवरील तीन स्थानकांच्या रुळांजवळ सध्या सफाई केली जात आहे. परंतु आमच्याकडून नेहमीच सर्व मार्गावर सफाई केली जाते. रेल्वे रुळांवरील कचरा हटविण्यासंदर्भातील भूमिका रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची आधीपासूनच राहिली आहे. पालिकेच्या साहाय्याने रुळावरील कचरा साफदेखील केला जातो. यासाठी आम्ही मध्यरात्री कचरा विशेष लोकल चालवून कचरादेखील उचलतो. परंतु रुळांजवळील असणारे अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांमधून पुन्हा कचरा रुळांवर टाकला जातो. यावर कायमचा तोडगा काढता येतो का याची चाचपणी केली जात आहे.  -डी. के . शर्मा, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे