पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या वर्षपूर्तीनिमित्त पुन्हा एकदा मुंबईकरांनी स्वच्छतेचा मंत्र जपला. महापालिकेने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने ठिकठिकाणी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन मुंबईकरांनी आपला परिसर स्वच्छ केला. तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक बकाल वस्त्यांमध्ये फिरून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचबरोबर विविध संस्थांनी मुंबईतील चौपाटय़ा, रेल्वे स्थानके, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली.

‘स्वच्छ भारत अभियाना’ला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने मुंबईत पुन्हा एकदा स्वच्छतेचा नारा देण्यात आला. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. पालिके अधिकारी आणि कर्मचारी मोठय़ा संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. त्याचबरोबर काही विभागांमध्ये राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेते आणि अभिनेत्रीही हाती झाडू घेऊन मुंबईकरांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते. सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवकही आपापल्या विभागांतील स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी झाले होते. नाल्यांकाठच्या काही झोपडपट्टय़ांमधील नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न गांधी जयंतीचे निमित्त साधून करण्यात आला.

पतांजली योग समिती, भारत स्वाभिमान,युवा भारत, किसान पंचायत आदी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरून बोरिवली, कांदिवली, भगतसिंग नगर, गोरेगाव, सांताक्रूझ, जुहू, दादर, कुलाबा, ठाणे, कल्याण डोंबिवली आदी विभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. त्याचबरोबर नागरिकांमध्ये स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसारही करण्यात आली. या संघटनांमधील महिला कार्यकर्त्यांही मोठय़ा संख्येने या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.