पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारतासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छ महाराष्ट्रासाठी सातत्याने प्रचार करत असूनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून घाण करण्यापासून ते नैसर्गिक विधी करण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना जागेवरच दंड आकारण्याचा अधिकार राज्य सरकारने महानगरपालिकांना प्रदान केला असून उघडय़ावर कचरा टाकणाऱ्यास १५० ते १८० रुपये दंड तर उघडय़ावर शौच करणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड बसणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना जागेवरच दंड आकारण्याचा अधिकार राज्य सरकारने महानगरपालिकांना प्रदान करण्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारने शनिवार, ३० डिसेंबर २०१७ रोजी जारी केला. त्याचबरोबर अशी घाण करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कमही निश्चित केली आहे. राज्याचा संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याचे एक ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच असल्याचे मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या शहरांतील चित्र आहे. त्या पाश्र्वभूमीवर हा राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन नियमावलीही राज्यात लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार ओला व सुका कचरा वेगळा करण्याची जबाबदारी कचरा निर्माण करणाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. शहरी भागांत ती सोसायटय़ांवर आहे. तसेच रोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होत असल्यास त्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. महानगरपालिकांनी त्याची अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी महानगरपालिका नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. पण अनेक ठिकाणी नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने अशा सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या लोकांना जागेवरच दंड करण्यासाठी महानगरपालिकांना अधिकार देण्यात येत असल्याचे याबाबतच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरविकास विभागाने दंडाची रक्कमही निश्चित केली आहे. पूर्वीच्या दंडाच्या तुलनेत त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रस्त्यावर घाण करणाऱ्यास अ व ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रात १८० रुपये दंड, तर क व ड वर्ग महानगरपालिका क्षेत्रात १५० रुपये दंड होईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास अ व ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रात १५० रुपये तर क व ड वर्ग महानगरपालिका क्षेत्रात १०० रुपये दंड होईल. उघडय़ावर लघवी केल्यास अ व ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रात २०० रुपये दंड, तर क व ड वर्ग महानगरपालिका क्षेत्रात १०० रुपये दंड होईल. उघडय़ावर शौच केल्यास चारही वर्गातील महानगरपालिका क्षेत्रांत ५०० रुपये दंड होईल.