गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय शक्य; कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून तरतूद

तुम्ही जितका कचरा निर्माण कराल त्याच्या पटीत पालिके ला आता कर भरावा लागणार आहे. तुमच्या सोसायटी किंवा आस्थापनापासून कचरा उचलून, वाहून नेण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका आता नागरिकांकडून कर वसूल करणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांपुढे मांडण्यात येणार असून त्यानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कचऱ्यावर कर आकारत नसल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये गेल्या वर्षी मुंबई महापालिकेचे मानांकन घसरले होते. त्यामुळे हा कर लावण्याची तयारी पालिकेने केली असल्याचे समजते.

पालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपत असल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना आणल्या. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली होती. त्याचा पुढचा भाग म्हणून आता कचऱ्यावर कर लावण्यात येणार आहे. गटनेत्यांनी मंजुरी दिल्यास रहिवासी आणि व्यापारी यांना येत्या काळात दरमहा हा कर भरावा लागणार आहे. या कचऱ्याचे दरही ठरवण्यात आले असून दर महिना १०० किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांना ६० रुपये भरावे लागणार आहेत. तर दुकाने व आस्थापनांसाठी हा दर ९० रुपये असणार आहे. साधारणत: प्रति माणशी अर्धा किलो कचरा रोज तयार होत असतो.

जकातीतून मिळणारे उत्पन्न गेल्यानंतर पालिकेचा महसूलाचा महत्त्वाचा स्रोत गेला. तर बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे विकास नियोजन विभागाचा महसूलही कमी झाला आहे. त्यामुळे पालिकेने सध्या महसूल वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, कचऱ्यावर कर लावण्याबाबत अद्याप अभ्यास सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर प्रस्ताव गटनेत्यांपुढे ठेवण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.