News Flash

स्वच्छता पथकाचा ‘गनिमी कावा’

स्पर्धेतील निकषांनुसार पाहणी करून पथक मुंबईतून निघून गेले आहे

स्वच्छता सर्वेक्षणात चांगले गुण मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदा विशेष प्रयत्न केले असले तरी, शहरातील काही भागांत अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. त्यामुळेच पालिका अधिकारी केंद्रीय पथकाच्या छुप्या सर्वेक्षणाबाबत चिंतेत आहेत.

सर्वेक्षणादरम्यान नागरिकांशी छुपा संवाद; गुण कमी मिळण्याची अधिकाऱ्यांना भीती

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत मुंबई शहराचा क्रमांक वर पोहोचवण्यासाठी गेले काही दिवस जबरदस्त ‘मेहनत’ घेत असलेल्या पालिका अधिकाऱ्यांना केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांच्या गनिमी काव्याने घायाळ केले आहे. स्वच्छता सर्वेक्षण करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या केंद्रीय पथकाला पालिकेचे अधिकारी शहरातील स्वच्छ परिसर दाखवत असतानाच या पथकातील काही अधिकाऱ्यांनी गुप्तपणे शहराचा फेरफटका मारून अन्य भागांतील परिस्थितीची पाहणी केली आहे. दुसरीकडे, हे पथक दिल्लीला परतले असले तरी, पथकाशी संबंधित काही अधिकारी गुप्तपणे मुंबईकरांशी संवाद साधून त्यांच्याकडून स्वच्छतेची माहिती घेत आहेत. त्यामुळे मुंबईकरांकडून नकारात्मक गुण मिळाल्यास शहराचा क्रमांक घसरण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांना वाटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची हाक दिल्यानंतर देशातील विविध शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छता राखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने या अभियानाअंतर्गत स्वच्छतेबाबत स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेत देशभरातील निरनिराळ्या शहरांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत सहभागी असलेल्या मुंबईला आघाडीचे स्थान मिळावे म्हणून मुंबई महापालिकेने गेल्या वर्षभरात विविध उपाययोजना केल्या आहेत. या सर्व उपाययोजना केल्यानंतर मुंबई स्वच्छ झाली का याची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक ४ जानेवारी रोजी मुंबईत दाखल झाले होते. शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ (सफाई कामगार) आहेत का, पुरेशी आणि स्वच्छ शौचालये आहेत का, नियमितपणे शहराची साफसफाई केली जाते का, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येते का, मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होत असलेल्या सोसायटय़ांमध्ये खतनिर्मिती केली जाते का, खतनिर्मिती न करणाऱ्या किती सोसायटय़ांवर नोटीस बजावण्यात आली याची पाहणी पथकातील पाचपैकी तीन सदस्य करीत होते. या तीन सदस्यांनी ४, ५ आणि ६ जानेवारी रोजी पालिका अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत फिरून या सर्व बाबींची पाहणी केली. मात्र त्याच वेळी पथकातील दोन अधिकारी अत्यंत गुप्तपणे मुंबईत फिरत होते.

मुंबईमध्ये उघडय़ावरच प्रात:विधी उरकले जात आहेत का, शौचालये स्वच्छ आहेत का, वस्त्यांमध्ये साफसफाई होते का, कचराभूमींची अवस्था आदी बाबींची पाहणी हे दोन सदस्य करीत होते. तसेच पालिका अधिकाऱ्यांसमवेत फिरणारे तीन सदस्यही अचानक मध्येच गायब व्हायचे आणि पालिका अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता मुंबईतील काही भागांची पाहणी केली. सर्वेक्षणाचे काम आटोपून या पथकाने ११ जानेवारी रोजी मुंबईला अलविदा केले. परंतु मुंबईच्या नेमक्या कोणत्या भागात या पथकाने सर्वेक्षण केले त्याचा पालिका अधिकाऱ्यांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे पालिका अधिकारी चिंतेत आहेत.

स्पर्धेतील निकषांनुसार पाहणी करून पथक मुंबईतून निघून गेले आहे. मात्र या अभियानाशी संबंधित काही मंडळी सध्या थेट मुंबईकरांशी संवाद साधत आहेत. ही मंडळी नेमकी कोणत्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधत आहेत याचा पालिका अधिकाऱ्यांना कल्पनाच नाही. त्यामुळे पालिका अधिकारी गोंधळून गेले आहेत. या गोपनीय सर्वेक्षणात मुंबईकरांनी शहरातील अस्वच्छतेचा पाढा वाचल्यास स्वच्छतेच्या प्रगतीपुस्तकावर लाल शेरा पडण्याची पालिका अधिकाऱ्यांना भीती आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 2:47 am

Web Title: swachh survekshan teams hidden communication with the citizens during survekshan
Next Stories
1 रेल्वे पोलीस दलातही आठ तास ‘डय़ुटी’
2 वरिष्ठ शिक्षकांवर रात्रशाळेचा भार
3 हँकॉक पुलाचे बांधकाम नेमके कधी सुरू करणार?
Just Now!
X