कला वक्तृत्वाची : स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद रामेश्वर मंदिरात गेले होते. तेथे जमलेल्या लोकांनी काहीतरी बोलावे अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणातील काही भाग.
धर्म हा अनुरागांत असतो, अनुष्ठानात नव्हे. हृदयातील पवित्र आणि निष्कपट प्रेमातच धर्माचे अधिष्ठान असते. जर देह आणि मन शुद्ध नसेल तर मंदिरात जाऊन शिवपूजा करणे व्यर्थ होय. या कलियुगात लोक इतके अवनत होऊन गेले आहेत की त्यांना वाटते की आपण एरवी हवे तसे वागू, तीर्थस्थानी जाताच आपली सगळी पापे धुऊन निघतील. परंतु वस्तुत: कुणी जर अपवित्र भावाने एखाद्या तीर्थाला जाईल तर तिथे जमा झालेले इतर सगळ्या लोकांचे पाप त्याच्या मानगुटीला येऊन बसेल. पापाचा आधीपेक्षा आणखी मोठा बोजा खांद्यावर घेऊन त्याला घरी परतावे लागेल. सगळ्या उपासनांचा सारांश आहे, शुद्धचित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे. गरीब, दुबळे, रोगी वगैरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो तेच खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात.
तुम्ही शुद्धचित्ताचे व्हावयास हवे आणि जो कुणी तुमच्याकडे येईल त्याची यथाशक्ती सेवा करावयास हवी. अशा भावाने दुसऱ्याची सेवा करणे हे शुभ कर्म होय. अशा सत्कर्माच्या शक्तीने चित्त शुद्ध होते आणि सगळ्यांच्या अंतर्यामी जो शिव वसत आहे तो त्या शुद्ध चित्तात प्रकट होतो. तो शिव सगळ्यांच्याच हृदयात विराजमान आहे. जर आरशावर धूळ, माती बसलेली असेल तर त्यात आपल्याला आपले रूप दिसत नाही. आमच्या हृदयरूपी आरशावरदेखील असला अज्ञानाचा आणि पापाचा मळ साचलेला आहे. सगळ्यात मोठे पाप म्हणजे स्वार्थीपणा हे होय. स्वार्थीपणा म्हणजे आधी स्वत:चीच फिकीर करणे. आधी आपलाच विचार करणे. मी आधी खाईन, मी सगळ्यांपेक्षा जास्त श्रीमंत होईन, मीच सगळ्या धनाचा मालक होईन असे ज्याला वाटते तो स्वार्थी होय.


कुणी धार्मिक आहे की अधार्मिक आहे याची पारख करावयाची असल्यास बघावे की ती व्यक्ती कितपत नि:स्वार्थ आहे. जो अधिक नि:स्वार्थ तोच अधिक धार्मिक होय. तोच शिवाच्या अधिक जवळ असतो. आणि जर कुणी स्वार्थी असेल तर तो जरी जगातील सारी मंदिरे पुजून आला, सगळ्या तीर्थामध्ये बुचकळून आला, रोज साऱ्या अंगभर वाघासारखे भस्माचे पट्टे ओढीत असला अन् चित्यासारखे टिळे-ठिपके काढीत असला तरी तो शिवापासून खूप खूप दूर आहे असे समजावे.
*****
स्वामी विवेकानंद यांनी मद्रास येथे दिलेल्या एका व्याख्यानातील काही भाग..
सामथ्र्यसंपन्न व्हा!
आपली उपनिषदे कितीही थोर असली, आपण ऋषींचे वंशज आहोत असा आपल्याला कितीही गर्व वाटला तरीही मला हे सांगितलेच पाहिजे की अन्य जातींशी तुलना करता आपण फार दुर्बल आहोत. प्रथमत: आपण शरीराने दुर्बल आहोत. आपले हे शारीरिक दौर्बल्य निदान आपल्या एकतृतीयांश दु:खाचे कारण आहे. आपण आळशी आहोत. आपण काम करू शकत नाही. आपण एकत्र येऊन कार्य करू शकत नाही. परस्परांवर आपण प्रेम करू शकत नाही. आपण अत्यंत स्वार्थी आहोत. आपल्यापैकी तीन जण जरी एकत्र आले तरी ते परस्परांचा द्वेष करतील, मत्सर करतील. आपली सध्याची अवस्था ही अशी आहे. आपल्यात मुळीच एकोपा नाही. आपली स्वार्थबुद्धी शिगेला पोहोचली आहे. कपाळावर आडवे गंध लावावे की उभे या गोष्टीसाठी आपण गेली शेकडो वर्षे परस्परांशी भांडत आहोत. एखाद्याच्या नजरेने माझे अन्न दूषित होईल काय, यासारख्या गोष्टींवर आपण मोठमोठे ग्रंथ लिहीत आहोत. या गोष्टी आपण गेली काही शतके करीत आलो. असल्या सुंदर व महत्त्वाच्या विषयांचे संशोधन करण्यात ज्यांचे सर्व बौद्धिक सामथ्र्य खर्ची पडले आहे अशा जातींकडून आपण कोणतीही उच्च अपेक्षा करू शकत नाही. आपण पोपटाप्रमाणे पुष्कळ गोष्टी बोलतो पण त्या प्रत्यक्ष करत नाही. केवळ बोलणे आणि काहीही न करणे ही आपली सवयच होऊन बसली आहे. याचे कारण काय? मानसिक दौर्बल्य हेच याचे कारण होय. दुर्बल मेंदू काहीच करू शकत नाही. आपण तो बलवान केला पाहिजे. प्रथम आपली तरुण पिढी सशक्त बनली पाहिजे. धर्म नंतरची बाब आहे. माझ्या तरुण मित्रांनो, सामथ्र्यसंपन्न व्हा! हा माझा तुम्हाला उपदेश आहे.
(श्रीरामकृष्ण आश्रम-नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’ खंड पाचवा या ग्रंथावरून साभार)

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’ पुणे, ‘आयसीडी’ औरंगाबाद (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ औरंगाबाद.

संकलन – शेखर जोशी