|| शैलजा तिवले/ संदीप आचार्य

‘के ईएम’मध्ये १२ वर्षांच्या दोन मुलांना जीवदान

मुंबई : भारतातील शासकीय रुग्णालयांतील बालकांमधील स्वॅप पद्धतीने केलेले पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केईएम रुग्णालयात झाले आहे. १२ वर्षांच्या दोन मुलांना एकमेकांच्या पालकांनी मूत्रपिंडदान करत जीवनदान दिले आहे. याआधी २०१५ मध्ये मोठ्या रुग्णांमध्ये स्वॅप पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपण राज्यात शासकीय रुग्णालयात केईएममध्येच प्रथम झाले होते.

मुंबई आणि सातारा येथील १२ वर्षांच्या या दोन्ही मुलांना जन्मजात मूत्रपिंडाचा आजार होता. सुरुवातीला वाडिया रुग्णालयात उपचार सुरू होते. यांचा आजार बराच काळ राहिल्यास डायलिसिस करावे लागणार होते. आजार या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याआधीच मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिल्याने ते केईएममध्ये उपचारासाठी आले होते.

दोन्ही बालकांमध्ये एकाची आई आणि दुसऱ्याचे वडील मूत्रपिंड देण्यास तयार होते; परंतु त्यांचे रक्तगट त्यांच्या मुलाच्या रक्तगटाशी जुळत नव्हते. त्यामुळे दोन्ही रुग्ण दात्याचा शोध घेत होते. दात्यांच्या नोंदणीमधून या बालकांच्या पालकांचे रक्तगट एकमेकांच्या पाल्यांशी जुळत असल्याचे दिसून आले. त्यांच्या पालकांना याविषयी माहिती दिली. दोन्ही पालकांनी संमती दिल्यावर ६ मार्चला केईएममध्ये दोन्ही बालकांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आली. मोठ्या व्यक्तींमधील मूत्रपिंडाचे लहान बालकांमध्ये प्रत्यारोपण करणे आव्हानात्मक होते; परंतु मूत्रविकार आणि हृदयविकार शस्त्रक्रिया विभागाने चारही शस्त्रक्रिया सहा तासांत यशस्वीपणे पूर्ण केल्या. दात्यांना पुढील तीन दिवसांत घरीदेखील पाठविले गेले.

एका बालकामध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर काही अडचणी आल्या. छोटी शस्त्रक्रियाही करावी लागली; परंतु आता सहा महिन्यांनंतर तो पूर्णपणे बरा झाला आहे. करोनाकाळातही यांची योग्य काळजी घेतली गेली. प्रत्यारोपण यशस्वी झाल्याने भविष्यातील डायलिसिसच्या वेदनांमधून या दोन्ही बालकांची सुटका झाली असून एक नवे आयुष्य जगत आहेत.

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खर्चीक असून यासारख्या शस्त्रक्रियेला एका रुग्णाला जवळपास सात लाखांपर्यंत खर्च येतो. त्यात स्वॅप प्रत्यारोपणासाठी योग्य दाते मिळणे फार अवघड असते. त्यामुळेच शासकीय रुग्णालयात या शस्त्रक्रिया उपलब्ध होणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील व्यक्तींसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मूत्रपिंडशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम जमाले यांनी व्यक्त केले.

या दोन्ही बालकांची शस्त्रक्रिया शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत झाली आहे. त्यामुळे या कुटुंबांवर कोणताही आर्थिक भार पडलेला नाही. नोंदणी केलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी हा आशेचा किरण आहे आणि केईएम रुग्णालय यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

स्वॅप प्रत्यारोपण म्हणजे काय?

ज्या व्यक्तीला प्रत्यारोपण करायचे असेल त्याच्या कुटुंबातील अवयवदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा रक्तगट किंवा मूत्रपिंडाचा प्रकार जुळत नाही, असे अनेकदा होते. अशा दोन व्यक्तींमध्ये एकमेकांच्या नातेवाईकांचे रक्तगट आणि अन्य बाबी जुळत असतील तर पहिल्या रुग्णाचे नातेवाईक दुसऱ्या रुग्णाला आणि दुसऱ्या रुग्णाचे नातेवाईक पहिल्या रुग्णाला अवयवदान करतात. यालाच स्वॅप प्रत्यारोपण असे म्हटले जाते.

बालकांमध्ये सहा वर्षाआधी प्रत्यारोपण अधिक फायदेशीर

लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाचे आजार असल्यास आणि भविष्यात मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलिसिसपर्यंत हा आजार जाणारा असल्यास सहा वर्षांच्या आतच मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे अधिक फायदेशीर असते. लहान मुलांची जसजशी वाढ होते तसतसे प्रत्यारोपित केलेले मूत्रपिंड योग्य रीतीने कार्यरत होते आणि पुढे इतर मुलांप्रमाणे त्यांना सामान्य जीवन जगता येते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मूल लहान असल्यास आजी-आजोबा साधारणपणे ५०-६० वयाचे असतात. समजा बालकाच्या आई-वडिलांचा रक्तगट न जुळल्यास आजी-आजोबांनाही अवयवदान करता येते. मूल मोठे झाल्यास आजी-आजोबा ७० च्या पुढे गेल्यास अवयवदान करणे अवघड असते. पालकांनी याबाबत वेळ न काढता तातडीने निर्णय घेऊन प्रत्यारोपणासाठी मुलाच्या नावाची नोंदणी करावी. वाडिया किंवा केईएम रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात, असे मूत्रविकारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले.

बालकांसाठी दात्यांची स्वतंत्र नोंदणी करण्याचा प्रस्ताव

बालकांमधील आजारासाठी पालकांचा वाडिया रुग्णालयात जाण्याकडे अधिक कल असतो. तेव्हा या रुग्णालयालाही प्रत्यारोपणाची मान्यता मिळाल्यास बालकांमध्ये लहान वयातच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातील. बालकांसाठीच्या दात्यांची स्वतंत्र नोंदणी करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ज्यामुळे कुटुंबीयांचा रक्तगट न जुळल्यास दाते लवकर प्राप्त होतील, अशी माहिती डॉ. पटवर्धन यांनी दिली.