स्वत:च्या बचावासाठी रिक्षातून उडी घेतल्यामुळे मेंदूला गंभीर दुखापत होऊन तीन आठवडे कोमात गेलेली स्वप्नाली लाड ही कोलशेत परिसरात रहाणारी २४ वर्षीय तरुणी अखेर मृत्यूच्या दाढेतून बुधवारी घरी परतली.
गेल्या महिनाभरापासून तिच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. या अपघातात तिचा काही प्रमाणात स्मृतीभ्रंश झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यामुळे स्वप्नालीला ‘त्या’ रात्रीच्या घटनेविषयी काहीच आठवत नाही, अशी माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. मात्र कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्रमंडळींना स्वप्नाली ओळखते आहे, अशी माहिती रुग्णालयाचे न्युरो सर्जन डॉ. हर्षद पुरंदरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. स्वप्नालीच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने रक्ताच्या गाठी बनल्या होत्या. त्यामुळे तिच्या मेंदूला सूज आली होती आणि ती कोमात गेली होती. या रक्ताच्या गाठी काढण्यासाठी दोन शस्त्रक्रिया केल्यानंतरही ती कोमात होती. तसेच जीवरक्षक प्रणालीच्या साहाय्याने श्वास घेत होती. आठ दिवसांनंतर तिच्यावर तिसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तीन आठवडय़ानंतर जीवरक्षक प्रणाली हळूहळू बंद करण्यात आली. वैद्यकीय उपचार आणि फिजीओथेरेपीमुळे तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून येत्या सहा महिन्यात ती पुर्णपणे बरी होऊ शकेल, असेही डॉ.पुरंदरे यांनी सांगितले.