स्टिकर, लेबल, फलक उपाययोजनांची जंत्री

निलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : हलवायाच्या दुकानातील सुटय़ा मिठाईवर कालमर्यादेच्या सूचनांची सक्ती केल्याने हलवायांचे काम चांगलेच वाढले आहे. शिवाय या नियमाचे पालन करताना सुरवातीचा महिनाभर अनेक अडचणी येणार असल्याचे मत हलवायांनी व्यक्त केले.

मुदत संपलेल्या मिठाई ग्राहकांनी खाल्लय़ा तर त्याद्वारे विषबाधा होऊ शकते. ही बाब लक्षात घेत अन्न व सुरक्षा प्रशासनाने १ ऑक्टोबरपासून सुटय़ा मिठाईवर कालमर्यादेची सूचना बंधनकारक केली आहे. या नियमाची अंमलबजावणी न झाल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचीही सूचना प्रशासनाने दिली आहे.

‘कालमर्यादा ठेवण्याला आमची हरकत नाही. पण त्यामागील अडचणीही प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजेत. केवळ कालमर्यादा लावून चालणार नाही, तर तो पदार्थ टिकवायचा कसा, याबाबतही सूचनावली ग्राहकांना द्यावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया माटुंगा येथील ब्रिजवासीचे अनिल अग्रवाल यांनी दिली. त्यांच्या मते, प्रत्येक मिठाईतील जिन्नस वेगळे असल्याने कालमर्यादा निराळ्या आहेत. शिवाय कोणता पदार्थ कोणत्या तापमानाला ठेवावा यावरही त्याचे टिकणे अवलंबून असते. काजुकतलीला साधारण तापमान लागते. परंतु रसगुल्ले मात्र थंड ठिकाणी ठेवावे लागतात. यात गोंधळ झाला तर पदार्थ मर्यादेच्या आधीच खराब होणार असेही ते नमूद करतात.

यासाठी स्टिकर, लेबल अशा बऱ्याच गोष्टी करण्याची तयारी हलवायांनी दाखवली आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी हे लेबल तयार करणारेच उपलब्ध नाहीत. याच अडचणींना दुजोरा देत चांदेरकर स्वीट्सचे राजेंद्र खांबकर सांगतात, ‘एका प्रकारची मिठाई असेल तर ठीक आहे. बहुतांशी लोक मिश्र मिठाई घेतात. अशावेळी नेमकी काय मर्यादा ठेवायची याचाही पेच आमच्यापुढे आहे. शिवाय  ग्राहकांनीही सांगितलेल्या तारखेला बाद पदार्थ फेकून द्यायला हवेत. अन्यथा तोही बडगा आमच्यावर आहे.’

यातील दंडाच्या रकमेबाबतही हलवायांची नाराजी आहे. त्यांच्या मते, हा नाशिवंत पदार्थ असल्याने कोणताही हलवाई जाणूनबुजून असे प्रकार करणार नाही. असे असताना ही सक्ती आणि लाखभराची दंड आकारणी कशासाठी. ‘दुकान उघडले आणि बसलो असेही आमच्या व्यवसायात नसते. स्वच्छता, पदार्थाची ठेवण, पाटय़ा लावणे, अशी बरीच कामे असतात. त्यात आत हा अतिरिक्त व्याप वाढला,’ असे चंदू हलवाईचे भारतेंद्र सिंह सांगतात. प्रत्येक मिठाईच्या खोक्यावर स्टीकर लावले तर तोही खर्च आहेच. ते लावण्यासाठी नवे यंत्र, संगणकीय प्रणाली असा एकूणच ताण वाढणार आहे, असेही ते म्हणाले.

गेलेले कामगार अद्याप परतलेले नाहीत. व्यवसायही निम्माच सुरू आहे. असे असताना या नियमाने कामचा भार अधिक वाढेल. हे सारे अंगवळणी पडायला किमान महिनाभर तरी लागेल त्यामुळे प्रशासनाने थोडी सहकार्याची भूमिका घ्यावी.

-कमलाकर रक्षे, लाडूसम्राट