ढगाळ हवामान, पावसाच्या शिडकाव्यानंतर गुरुवारी तापमान अचानक वाढल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. ओसरत चाललेल्या स्वाइन फ्लूच्या साथीचा जोर याच हवामान बदलामुळे वाढल्याने पालिका यंत्रणाही धास्तावली आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईत आणखी २६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी दोघांचा या आजारामुळे मृत्यू झाला.     
तापमान वाढल्याने स्वाइन फ्लूची साथ ओसरली होती. गेल्या आठवडय़ात दरदिवशी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी तीन ते चारवर आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागानेही सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र ढगाळ हवामान, तापमानातील चढउतार यामुळे स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. मंगळवारपासून गुरुवापर्यंत तीन दिवसांत शहरात आणखी २६ रुग्णांची भर पडली. त्यातील चार रुग्ण उपचारांसाठी मुंबईबाहेरून आले होते.
मार्च महिन्यातच मुंबईतील तापमानाने चाळिशी ओलांडली होती. मात्र पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्याने आणि ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने अचानक वातावरणात बदल झाले. दोन दिवसांपूर्वी मुंबईकरांना अवकाळी पावसाचाही फटका बसला.
मात्र आता कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी, बुधवापर्यंत ३१-३२ अंश सेल्सिअस असलेले तापमान गुरुवारी थेट ३४.८ अंश सेल्सिअस एवढे पोहोचले. हे तापमान यापुढेही वाढतच राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.  यामुळे स्वाइन फ्लूच्या साथीला अटकाव होऊ शकेल, असा विश्वास पालिका वर्तुळात व्यक्त होत आहे.
कोकणात जोरदार पाऊस
गुरुवारी सायंकाळी उशिरा चिपळूण, रत्नागिरी भागात विजांसह जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे.

स्वाइन  तांडव
’घाटकोपर येथील २६ वर्षांच्या तरुणाचा केईएम येथे ११ एप्रिल रोजी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्याच्यावर ५ एप्रिलपासून केईएममध्ये उपचार सुरू होते.
’नाशिकवरून केईएममध्ये उपचारांसाठी आलेल्या पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या २२ वर्षीय महिलेचा १५ एप्रिल रोजी मृत्यू झाला.
’आतापर्यंत शहरात सुमारे दोन हजार स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या ४२ झाली आहे.