३१०१ बाधीत, ३३० रुग्णांचा मृत्यू; नाशिक शहरात सर्वाधिक बळी

राज्यात स्वाईन फ्लूच्या विषाणूंनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आतापर्यंत राज्यात ३१०१ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली असून ३३० रुग्णांचा यामुळे बळी गेला आहे. नाशिक शहरात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

जानेवारी ते २३ जुलै या कालावधीत राज्यभरात स्वाईन फ्लूच्या १ लाख १९ हजार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २४,३३७ रुग्णांना ऑसेलटॅमिवीर औषध देण्यात आले आहे. तर आतापर्यंत ३१०१ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली असून ३३० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. ३३० रुग्णांपैकी २ रुग्ण हे कर्नाटक व ३ रुग्ण मध्यप्रदेशातील आहेत. मृत्यू पावलेले सर्वाधिक ३५ रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. त्यानंतर पुण्याचे २९ आणि नागपूरच्या २४ रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू हा सर्वसाधारण फ्लूप्रमाणे असला रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना या आजाराची लागण होते. त्यासाठी  गर्भवती महिला, वयोवृद्ध, लहान मुले याशिवाय मधुमेही, रक्तदाबाचे रुग्ण यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सध्या स्वाईन फ्लूची लक्षणे आढळलेल्या ३ ते ४ हजार रुग्णांची दररोज तपासणी करण्यात येत आहे.

सध्या आढळणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या लक्षणांमध्ये बदल जाणवत असल्याने केवळ लक्षणांवरुन हे रुग्ण ओळखणे अवघड जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला, घशाचा संसर्ग याबरोबरच अतिसार, उलटय़ा ही लक्षणेही दिसत आहे. स्वाईन फ्लूची लागण झाल्यामुळे सध्या ४१९ रुग्णे रुग्णालयात भरती आहेत. तर पुण्यातील ११ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून पिंपरी-चिंचवड येथे २ व नागपूर येथील २ रुग्णांनाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. स्वाईन फ्लू लक्षणे आढळलेल्या सर्वच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. पौष्टिक आहार, व्यायाम व विश्राम योग्य पद्धतीने घेतला तर रुग्ण बरा होऊ शकतो. गेल्या सात महिन्यात स्वाईन फ्लूची लागण झालेल्या राज्यातील २,३५२ रुग्णांची तब्येत सुधारली असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.