हवामान बदलामुळे दक्षतेचा इशारा; आजाराने १९९ मृत्युमुखी

हवामानात सातत्याने होत असलेल्या विचित्र बदलामुळे आगामी काळात राज्यात स्वाइन फ्लूचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होण्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. प्रामुख्याने पुणे आणि नाशिक जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूची लागण मोठय़ा प्रमाणात झाली असून या आजाराने १९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्वाइन फ्लूचे ७२४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

राज्यात जानेवारीपासून ऑक्टोबपर्यंत दीड हजार लोकांना स्वाइन फ्लू झाला असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांपैकी जवळपास चाळीस टक्के रुग्ण हे अतिजोखमीच्या गटातील असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यातील मधुमेह, हृदयविकार तसेच गर्भवतींना सर्दी, ताप आदी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास त्यांना तात्काळ टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.  पहिल्या टप्प्यातील काही रुग्णांमध्ये एच १ एन १ची चाचणी केल्यानंतरही स्वाइन फ्लू आढळून येत नसल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णांवरील उपचाराप्रमाणे औषधोपचार केला जातो. तथापि तीन ते चार दिवसांनंतर त्याच रुग्णामध्ये चाचणीनंतर स्वाइन फ्लू आढळून येतो. असे रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे आवश्यकतेनुसार पुन्हा स्वाइन फ्लूची चाचणी करावी अशाही सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

परिस्थिती काय?

पुणे जिल्ह्य़ात वेगवेगळ्या रुग्णालयांत ८० रुग्ण दाखल आहेत तर नाशिक जिल्ह्य़ातील रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे ७६ रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांपैकी दोनशेहून अधिक रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पुणे व नाशिकपाठोपाठ औरंगाबाद कोल्हापूर येथीही स्वाइन फ्लूची लागण मोठय़ा प्रमाणात झाली असून सध्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये तीन लाख १० हजार टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा साठा आहे.    – डॉ. संजीव कांबळे, आरोग्य संचालक