सर्वत्र घबराट पसरवणारा स्वाइन फ्लू हा आजार विषाणूंमुळे पसरतो असे तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा माहिती तपासून घ्या. कारण ‘स्वाइन फ्लू हा हृदयविकार आहे’ असे महापौर स्नेहल आंबेकर यांनी ठासून सांगितले आहे! एवढीच माहिती देऊन त्या थांबल्या नाहीत. हा आजार उष्ण हवामानात होत असल्याने शहरात मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. साथीच्या आजारांविषयी जनजागृतीवर पालिका खर्च करत असलेले कोटय़वधी रुपये पाण्यातच जात असल्याचे खुद्द महापौरांनीच गुरुवारी सिद्ध केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महापौरांना स्वाइन फ्लूच्या साथीविषयी विचारले गेले. त्यावर महापौरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर नेमके काय बोलावे, हे उपस्थितांना कळत नव्हते. महानगरपालिकेत मात्र याविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे. ‘स्वाइन फ्लूविषयी शाळेतील विद्यार्थ्यांनाही माहिती आहे. मग मुंबईच्या महापौर असे बेताल वक्तव्य कसे करू शकतात, मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असलेल्या पदावरील व्यक्तीला हे अजिबात शोभणारे नाही,’ असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी व्यक्त केले. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौरांचे विधान हे अज्ञान व बेजबाबदारपणा दाखवणारे असल्याचे म्हटले आहे. महापौरांचे विधान ऐकून मुंबईची इतरांसमोर काय प्रतिमा तयार होईल, याचा विचार करा, असा टोलाही त्यांनी हाणला.  डेंग्यूबाबतही महापौरांनी असेच विधान केले होते. डेंग्यू हा सामान्य अजार असून, प्रसारमाध्यमांनीच त्याला मोठे केल्याचे महापौर म्हणाल्या होत्या. त्यामुळेही त्या वादात सापडल्या होत्या.

*स्वाइन फ्लूमुळे खोपोली येथील ४३ वर्षांच्या पुरुषाचा महापालिकेच्या रुग्णालयात गुरुवारी दुपारी मृत्यू झाला.
*स्वाइन प्लूचा संसर्ग झालेल्या मुंबईकरांची संख्या १८२ वर पोहोचली आहे.  
*या साथीमुळे राज्यात ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथे स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक २२ मृत्यू झाले आहेत.