गेल्या वर्षी मुंबईसह राज्यात हाहाकार माजवणाऱ्या स्वाइन फ्लूची साथ या वेळी आटोक्यात आहे. या वेळी आतापर्यंत राज्यात ६० हून अधिक रुग्ण व १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वाइन फ्लूच्या मृत्यूंमध्ये घट झाली असून स्वाइन फ्लू उपचारांनी बरा होण्याचे प्रमाणही जास्त आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून राज्यभरात स्वाइन फ्लूची साथ दिसू लागली होती. मार्चअखेपर्यंत मुंबईत दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते व १३ मृत्यूंची नोंद झाली होती. या वर्षी मुंबईत आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली असली तरी हा आजार प्राणघातक ठरलेला नाही. राज्यात १३ मृत्यूंची नोंद असून पुण्यात सहा, पिंपरी चिंचवडमध्ये एक, नाशिकमध्ये दोन तर चार मृत्यू जळगाव, लातूर, अकोला आणि नागपूरमध्ये झाले आहेत. स्वाइन फ्लूची साथ वाढल्याचे दिसत आहे, मात्र गेल्या वर्षी या दोन्ही महिन्यांत दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले.