गर्भवतींसाठी स्वाइन फ्लूची मोफत लस देण्याच्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद नागपूरमध्ये मिळत आहे. या वर्षांत नागपूरमध्ये स्वाइन फ्लूमुळे ७० हून अधिक मृत्यू झाल्याच्या भीतीने तसेच नजीकच्या आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असल्याने अधिकाधिक गर्भवती लस टोचण्यास पुढे आल्या आहेत.
या वर्षांत स्वाइन फ्लूचे ६३ हजारावर संशयित रुग्ण नोंदले गेले आहेत. ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण केवळ औषधांमुळे बरे झाले आहेत. मात्र कमी प्रतिकारक्षमता असलेले वृद्ध, लहान मुले, इतर आजार असलेल्या व्यक्ती तसेच गर्भवती स्त्रियांमध्ये या आजारामुळे गंभीर स्थिती निर्माण होत असल्याचे आढळले. त्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी स्वाइन फ्लूच्या मोफत लसी पुरवण्याची योजना राज्याच्या आरोग्य विभागाने राबवली.
त्यानुसार मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, लातूर, औरंगाबाद अशा सहा शहरांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. आरोग्य विभागाकडून याआधी डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी स्वाइन फ्लूची लस टोचण्याची योजना राबवण्यात आली होती. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही योजनाही टप्प्याटप्प्याने राबवण्याचे ठरले होते. सध्या या योजनेला नागपूरमधून सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईत कमी प्रतिसाद
नागपूरमध्ये ५६५, मुंबईत २३२, नाशिकमध्ये ४९, पुण्यात २४, लातूरमध्ये ३, औरंगाबाद येथे एका गर्भवतीने लस टोचून घेतली आहे. एकूण ८७४ पैकी ६५ टक्क्यांहून अधिक प्रतिसाद फक्त नागपूरमध्ये मिळाला आहे.
या वर्षी नागपूरमध्ये स्वाइन फ्लूमुळे राज्यातील सर्वात जास्त ७० मृत्यू झाले आहेत. याचा धसका असल्याने तसेच नागपूर हे शहर मुंबईच्या तुलनेत लहान असल्याने स्वाइन फ्लूची लस घेण्यासाठी तुलनेने कमी अंतरावर जावे लागल्याने तेथे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत आतापर्यंत स्वाइन फ्लूने ४४ मृत्यू झाले आहेत. कस्तुरबा रुग्णालयासह आणखी तीन प्रसूतिगृहांमध्ये पालिकेने ही लस उपलब्ध केली आहे. मात्र दूरच्या केंद्रावर जाऊन लस घेण्यात अडचणी येत असल्याने मुंबईतील लसीकरणाच्या मोहिमेला थंड प्रतिसाद आहे.