हृदयविकार असलेल्या ८० वर्षांच्या वृद्धाचा स्वाइन फ्लूमुळे शनिवारी मृत्यू झाला. जुलैमध्ये स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून स्वाइन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरातील ७५ हून अधिक रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे आढळले आहे.
विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला ११ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यात अडथळे येत होते. हृदयविकार तसेच अर्धागवायूमुळे अर्धे शरीर लुळे पडलेल्या या वृद्धावर औषधांचा परिणाम दिसून येत नसल्याने १४ जुलै रोजी त्यांना पालिकेच्या संसर्गजन्य आजाराच्या कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. चाचणीअंती त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. टॅमी फ्लूने उपचार सुरू करूनही पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती संसर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी दिली.
आतापर्यंत स्वाइन फ्लूचे एचवनएनवन हे विषाणू पावसाळ्यानंतर तसेच हिवाळ्यानंतर अधिक प्रभावी होत. ऋतू बदलताना स्वाइन फ्लूची साथ येत असे. त्यातही थंड व कोरडय़ा हवामानात या विषाणूंचा प्रभाव वाढलेला दिसत होता. मात्र आता संपूर्ण राज्यात स्वाइन फ्लूची साथ नसताना केवळ मुंबईत गेल्या पंधरवडय़ात तब्बल ७५ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ‘आतापर्यंत मृत्यू झालेल्या पाच रुग्णांपैकी एक रुग्णाचे योग्य निदान होण्यासाठी विलंब झाला होता. गुरुवारी मृत्यू झालेल्या दोन तरुणींपैकी एक जण अतिलठ्ठ होती, तर शनिवारी हृदयविकार असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. मात्र इतर दोघांबाबत गंभीर आजाराची पाश्र्वभूमी नव्हती,’ असे कस्तुरबा रुग्णालयातील संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. नवजात शिशू, लहान मुले, गर्भवती , वृद्ध, रुग्ण, मधुमेह-हृदयविकार-रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

जुलैमधील रुग्ण
साथ २०१४ २०१५
ताप ७५४० ३५६३
हिवताप ८४८ ३३७
लेप्टो १४ ६०
डेंग्यू ५२ २२
स्वाइन फ्लू १ ७५
गॅस्ट्रो १९८६ ८२२
हिपॅटिटीस १७६ ५८

’खोकताना, शिंकताना हातरुमालाचा वापर करा.
’लक्षणे आढळताच डॉक्टरांशी संपर्क करा.
’लक्षणे नाहीशी झाली तरी डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधे बंद करू नका.
’सर्व सरकारी व पालिका रुग्णालयात उपचारांची व्यवस्था.
’फ्लूच्या इतर लक्षणांप्रमाणेच सुरुवातीला सर्दी, खोकला, ताप येऊ लागतो. घसा खवखवतो, श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अंगदुखी व डोकेदुखी वाढते.