‘जातपंचायतीला मूठमाती’ अभियानाला प्रतिसाद देऊन खाप पंचायत बरखास्त करणाऱ्या वैदू समाजाने शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर स्वित्र्झलडमधील शिफर्ट या डॉक्टर दाम्पत्याने या मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. आजवर या दाम्पत्याने वैदू समाजातील मुलांसाठी सात लाख रुपयांचा निधी दिला आहे. २१ जानेवारी रोजी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.

मुंबईत दिवा, जोगेश्वरी या भागात वैदू समाजाच्या १४ वस्त्या आहेत. आजही येथील अनेक कुटुंबे परंपरेने चालत आलेला औषधांचा व्यवसाय करतात. पदपथावर औषधांच्या विक्रीतून ते चरितार्थ चालवीत असतात. मुली लोकलमध्ये फिरून वस्तू विकतात. त्यातून त्यांना पैसे मिळतात.

घरातील लहान मुलांना सांभाळणे आणि घरातील काम करण्यातच वैदू समाजातील बहुतांश मुलींचे शालेय शिक्षण घेण्याचे वय निघून जाते, अशी व्यथा दुर्गा गुडीलू यांनी व्यक्त केली.

वैदू समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या वाटेवर आणण्याची गरज आहे. शिक्षणासाठी लागणारे पैसे जमवणे या मुलांच्या पालकांना अवघड जाते. यासाठी वैदू समाजातील दुर्गा यांनी मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी मदत करीत आहेत.

आजवर अशा मदतीतून वैदू समाजातील ४००हून अधिक मुले शालेय शिक्षण घेत आहे. क्रिस्टॉफ आणि मॅडेलियीन शिफर्ट या दाम्पत्याने दिलेल्या सात लाख रुपयांच्या निधीतून १०० मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यात येत आहे. २१ जानेवारी रोजी स्वित्र्झलडहून येऊन  हे दाम्पत्य वैदू समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

मुलांना शैक्षणिक मदत मिळावी यासाठी आम्ही विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे. या मुलांनीही भविष्यात त्यांच्या समाजातील इतर गरजू मुलांना मदत करावी अशी आशा आहे.

मॅडेलियीन शिफर्ट