भक्ती परब/ ॠषिकेश मुळे

‘ट्राय’च्या नव्या नियमांचा परिणाम; काहींना फायदा तर काहींच्या खिशाला कात्री

मुंबई/ठाणे : भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांच्या प्रसारणासंदर्भात केलेले नवीन नियम शनिवारपासून (२९ डिसेंबर) अमलात येत आहेत. या नियमांमुळे ग्राहकांना त्यांना हव्या तेवढय़ा वाहिन्यांसाठीच मासिक शुल्क मोजावे लागणार आहे. हा नवा नियम ग्राहकांच्या फायद्याचा असल्याचा दावा ‘ट्राय’ आणि ग्राहक संघटना करत असताना केबलसेवा पुरवठादारांनी मात्र हा नियम ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारा असल्याचा दावा केला आहे. ग्राहकवर्गात मात्र या नियमांबाबत संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने मुंबई-ठाण्यातील विविध आर्थिक उत्पन्न गटातील कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या टीव्ही वाहिन्यांची गरज आणि त्यानुसार त्यांना किती शुल्क मोजावे लागेल, याचा आढावा घेतला. जवळपास निम्मे भारतीय ग्राहक जास्तीत जास्त ३० वाहिन्या पाहत असल्याचा ‘दि ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’च्या (बार्क) पाहणीत आढळले आहे. मात्र, ‘लोकसत्ता’ने केलेल्या चाचपणीत बहुसंख्य घरांत जास्तीत जास्त १० वाहिन्याच पाहिल्या जात असल्याचे आढळून आले. ‘ट्राय’च्या नव्या नियमांमुळे जास्तीत जास्त वाहिन्या पाहणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार असून लोकप्रिय वाहिन्यांसाठीदेखील जास्त शुल्क भरावे लागणार आहे.

शुल्क आकारणी कशी?

‘ट्राय’ने १०० नि:शुल्क वाहिन्यांचा मूलभूत संच तयार केला असून दरमहा १३० रुपये (कर अतिरिक्त) भरून या वाहिन्या ग्राहकांना पाहता येणार आहेत. मात्र, नि:शुल्क वाहिन्यांमध्ये लोकप्रिय वाहिन्यांचा समावेश नसल्याने अशा वाहिन्यांचा आनंद घेण्यासाठी त्यांचे शुल्क ग्राहकांना मोजावे लागणार आहे. स्टार, सोनी, झी, कलर्स अशा प्रमुख लोकप्रिय वाहिन्यांच्या कंपन्यांनी आपापल्या वाहिन्यांचे मूलभूत संच (बेसिक पॅक) करून त्यांचे मासिक शुल्क जाहीर केले आहे. त्यानुसार ९५ वाहिन्या १८४ रुपयांत उपलब्ध होतील. ‘ट्राय’ने प्रत्येक अतिरिक्त २० वाहिन्यांसाठी २५ रुपयांचे नेटवर्क शुल्क आकारले आहे. त्यामुळे या वाहिन्यांसाठी अतिरिक्त १०० रुपये द्यावे लागतील.  हा हिशेब केल्यास ग्राहकांना ४१४  रुपये (१३० + १८४ + १००) भरावे लागेल. यात करांची भर पडेल, ती वेगळीच. अर्थात आवडीनुसार ठरावीक वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्यही ग्राहकांना आहे.

प्रमुख वाहिन्यांचे ‘व्हॅल्यू पॅक

* स्टार इंडिया – ४९ रुपये (१३)

* झी एंटरटेनमेंट – ४५ रु.  (२४)

* सोनी पिक्चर्स नेटवर्क – ३१ रुपये (९)

* डिस्ने – १० रुपये (७)

* डिस्कव्हरी – ८ रुपये (८)

* कलर्स – २५ रुपये (२०)

* टाइम्स नेटवर्क – ७ रुपये (४)

* टर्नर – ४.८ रुपये (२)

* एनडीटीव्ही – ३.५ रुपये (४)

* टीव्ही टुडे – ७५ पैसे (२)

(कंसात वाहिन्यांची संख्या)