भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकीटांचा काळा बाजार सुरू असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना मोफत २५० पास देण्यात आल्याचे वृत्त आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर गुरूवारी होणाऱ्या या सामन्यासाठी एकीकडे क्रिकेटरसिक आसुसलेले असताना मुख्य सचिवांना इतक्या मोठ्याप्रमाणात देण्यात आलेल्या पासेसमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वाधिन क्षत्रिय यांच्याकडून हे आरोप फेटाळण्यात आले असले तरी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वानखेडेची प्रेक्षकक्षमता ३३००० इतकी असली तरी यापैकी केवळ चार हजार तिकीटेच क्रिकेट रसिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती.
भारत-विंडीज सामन्याचे तिकीट १० हजारांना! 
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याचे २५० पासेस पाठवत असल्याचे पत्र एमसीएने २८ मार्चला क्षत्रिय यांना पाठवले होते. या पत्रावर सहसचिव पी.व्ही.शेट्टी व उमेश खानविलकर यांची स्वाक्षरी आहे. या पत्राची प्रत अनिल गलगली यांच्या हाती लागली आहे. त्याधारे गलगली यांनी तक्रार दाखल केली आहे. सध्या एमसीएच्या ताब्यात असलेल्या एका भूखंडाच्या नियम उल्लंघनप्रकरणीची कारवाई टाळण्यासाठी क्षत्रिय़ यांना मोफत पास देण्यात आल्याची शंका गलगली यांनी व्यक्त केली आहे. या सामन्यासाठी एमसीएकडून महत्त्वाच्या व्यक्ती, आमदार, वरिष्ठ राजकीय नेत्यांना तब्बल ४५० पासेस देण्यात आल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. मात्र, तरीही आमदारांकडून या सामन्याच्या तिकीटांसाठी प्रचंड लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे.
1-3969a30a20