News Flash

ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मुळगावकर यांचे निधन

तबल्याचे प्राथमिक धडे त्यांनी उस्ताद बाबलाल इस्लामपूरकर यांच्याकडे गिरविले.

ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मुळगावकर

पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास या दिग्गजांसह शास्त्रीय संगीतातील अनेक मान्यवरांना संगीतसाथ करणारे कलावंत, संपूर्ण आयुष्य तालसाधनेत वेचून त्यातील ज्ञानसंचित पुढील पिढीकडे सढळ हस्ते सुपूर्द करणारे ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मुळगावकर यांचे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता अल्पशा आजाराने दादर येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित कन्या, जावई आणि दोन नाती असा परिवार आहे.

तबल्याचे प्राथमिक धडे त्यांनी उस्ताद बाबलाल इस्लामपूरकर यांच्याकडे गिरविले. त्यानंतर तबलानवाझ उस्ताद आमीर हुसेन खाँ यांच्याकडे गंडा बांधून गुरुकुल पद्धतीने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. आपले गुरू उस्ताद आमीर हुसेन खाँ स्मृतीप्रीत्यर्थ त्यांनी बंदिश तबला आर्ट फाऊंडेशनची स्थापना केली. ही संस्था गेली ४५ वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नामवंत कलाकारांना तबलासाथ करण्याचे भाग्य पं. मुळगावकर यांना लाभले. पं. भीमसेन जोशी, पं. कृष्णराव पंडित, पं. शरदचंद्र आरोलकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास, निर्मलादेवी, पं. अजय पोहनकर, पं. रविशंकर, उस्ताद रईस खान, उस्ताद हलीम जाफर खान, उस्ताद मोईनुद्दीन डागर यांचा यात समावेश आहे.

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर पं. मुळगावकर यांनी ‘तबला’ या परिपूर्ण ग्रंथाची निर्मिती केली. १९७५ मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. संगीत क्षेत्रात आणि देशातील प्रमुख विद्यापीठांतून हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून महत्त्वाचा मानला जातो. गुरू उस्ताद आमीर हुसेन खाँ यांच्यावरही त्यांनी ‘डोह’ या नावाचा चरित्रात्मक ग्रंथ लिहिला असून यात त्यांनी खाँ साहेबांच्या २२६ बंदिशींचा समावेश केला आहे. ‘गुस्ताकी माफ’ हे त्यांचे आणखी एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. देशातील प्रमुख विद्यापीठांमधून ‘अभ्यागत व्याख्याता’ म्हणूनही त्यांनी काम केले. म्युनिसिपल कला अकादमी- मुंबई, तानसेन पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार निवड समिती-मध्य प्रदेश या शासकीय सल्लागार समित्यांवरही त्यांनी काम केले होते. पं. मुळगावकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उशिरा शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पं. अरविंद मुळगावकर यांनी आमीर हुसेन खाँ साहेबांच्या तबला शैलीचे उत्कृष्ट विवेचन पुढील पिढय़ांसाठी करून ठेवले आहे. तसेच त्यांच्या बंदिशींचा अमूल्य ठेवाही सर्वासाठी उपलब्ध करून दिला आहे. तरुण लाला, संदीप पवार, मुक्ता रास्ते आणि अनेक तरुण शिष्य त्यांनी घडविले. या सर्वाकडून खूप अपेक्षा आहेत.

अमरेंद्र धनेश्वर, ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 4:20 am

Web Title: tabla artist pandit arvind mulgaonkar passed away
Next Stories
1 शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी
2 कर्जमाफीवरून गोंधळ; कामकाज तहकूब
3 मराठी ज्ञानभाषा व्हावी ही सरकारचीही भूमिका
Just Now!
X