News Flash

शरणागती न पत्करणाऱ्या आरोपीविरुद्ध ‘टाडा’ न्यायालयाचे अटक वॉरंट

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात दोषी ठरविण्यात आलेले काही आरोपी सध्या जामिनावर बाहेर असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शरणागती पत्करण्यासाठी दिलेली मुदतही संपुष्टात आली आहे. शरणागती पत्करण्यासाठी

| April 21, 2013 02:58 am

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात दोषी ठरविण्यात आलेले काही आरोपी सध्या जामिनावर बाहेर असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शरणागती पत्करण्यासाठी दिलेली मुदतही संपुष्टात आली आहे. शरणागती पत्करण्यासाठी यापैकी एका आरोपीवर विशेष ‘टाडा’ न्यायालयाने शनिवारी अटक वॉरंट बजावले, तर दुसऱ्या आरोपीने शनिवारी न्यायालयासमोर शरणागती पत्करली.
सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता संजय दत्तसह जामिनावर बाहेर असलेल्या ४६ आरोपींना शरणागती पत्करण्यासाठी गेल्या १८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती, परंतु संजयसह आठ जणांनी शरणागतीसाठी मुदतवाढ मागण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांची मागणी मान्य करीत न्यायालयाने त्यांना शरणागतीसाठी आणखी चार आठवडय़ांची मुदतवाढ दिली.
दरम्यान, ३६ आरोपींपैकी काहींनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीच्या आदल्या, तर काहींनी त्याच दिवशी विशेष ‘टाडा’ न्यायालयासमोर शरणागती पत्करली, परंतु बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन याचा हस्तक मनोज कुमार गुप्ता ऊर्फ मुन्नासह दोन आरोपींनी शरणागती पत्करली नव्हती. शरणागती पत्करण्यासाठी त्यांना ‘टाडा’ न्यायालयाने शनिवापर्यंतची वेळ दिली होती, परंतु गुप्ताने शनिवारीही शरणागती पत्करली नाही. तसेच तो सापडत नसल्याचे ‘सीबीआय’कडून सांगण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अखेर अटक वॉरंट बजावले.
टायगरने बॉम्बस्फोटांसाठी पाठवलेले आरडीएक्स आणि शस्त्रांचा साठा दिघी व शेखाडी बंदरांत उतरविण्यासाठी मदत केल्याचा आणि मुंबईत हा साठा आणून तो सहआरोपींपर्यंत पोहोचविल्याचा आरोप गुप्तावर ठेवण्यात आला होता. न्यायालयाने त्याला या आरोपांत दोषी ठरवून १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती, परंतु खटल्याचा निकाल येण्यापूर्वीच त्याने हा काळ तुरुंगात काढल्याने त्याची जामिनावर सुटका झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याची १४ वर्षांची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेप सुनावली आहे. त्यामुळे त्यालाही न्यायालयाने शरणागती पत्करण्यासाठी १८ आठवडय़ांची मुदत दिली होती. दुसरीकडे माजी सीमाशुल्क अधिकारी रणजीत सिंह याने शनिवारी न्यायालयासमोर शरणागती पत्करली. कौटुंबिक कारणांमुळे आपण १८ एप्रिल रोजी शरणागती पत्करली नसल्याचेही त्याने न्यायालयाकडे स्पष्ट केले. सिंग याला न्यायालयाने नऊ वर्षांची शिक्षा सुनावली असून त्याने यापूर्वीच आठ वर्षे तुरुंगात काढली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 2:58 am

Web Title: tada court issued arrest warrent against accused who are not surrendered
Next Stories
1 मैदानासाठी आरक्षित भूखंडावर गाळे बांधले
2 ‘चौसष्ट घरांची राणी’ व्हिवा लाऊंजमध्ये!
3 मुंबई-कोकण रेल्वे गाडय़ांचे आरक्षण फुल्ल!
Just Now!
X