१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आणि कुख्यात गुंड अबू सालेम याने लखनऊ येथील न्यायालयात नेले जात असताना धावत्या गाडीत आणि तेही पहाऱ्यावरील पोलिसांच्या साक्षीने केलेल्या ‘निकाहा’बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मंगळवारी विशेष ‘टाडा’ न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना सालेमच्या या ‘निकाहा’ची चौकशी करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.  
एका इंग्रजी वृत्तपत्राने सालेमच्या एक्स्प्रेसमधील लग्नाबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची गंभीर दखल सालेमविरुद्ध बॉम्बस्फोट खटला चालविणाऱ्या विशेष ‘टाडा’ न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली. हे प्रकरण गंभीर आहे. लखनऊ येथील न्यायालयात सालेमला एक्स्प्रेसने कडेकोट बंदोबस्तात नेले जात होते आणि त्याच वेळेस त्याने अशाप्रकारे, पहाऱ्यावरील पोलिसांच्या साक्षीने विवाह करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने सालेमच्या या ‘निकाहा’ची चौकशी करून १० दिवसांमध्ये त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.