अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची यंदाची निवडणूक मुंबई विभागातील बनावट मतपत्रिकांमुळे चांगलीच गाजली. अखेर मंगळवारी निकाल जाहीर झाला. त्यात विनय आपटे प्रणित नटराज पॅनल आणि मोहन जोशी प्रणित उत्स्फूर्त पॅनलला १६ पैकी समसमान म्हणजे प्रत्येकी ८ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे आता कोणत्या पॅनलचा अध्यक्ष होणार याबाबत अधिकच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेल्या २२ उमेदवारांच्या मतांवर  भिस्त राहणार आहे.  
निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी नाटय़ परिषद निवडणुकीच्या मुंबई विभागाच्या मतमोजणीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये नटराज पॅनलचे प्रमुख विनय आपटे (२०४३ मते), अशोक हांडे (२०१९मते), नीना  कुलकर्णी (२०४२ मते ), सुकन्या कुलकर्णी (२०३९ मते), विजय केंकरे (२०२१ मते), गिरीश ओक (२००४ मते),
मोहन जोशी (१९९८ मते), अरूण नलावडे (१९९१ मते), स्मिता तळवलकर (१९७९ मते), वंदना गुप्ते (१९६४ मते), चंद्रकांत कुलकर्णी (१९४५ मते), सुधीर भट (१९२८ मते), लता नार्वेकर (१९१६ मते), राजन भिसे (१९१० मते), दीपक करंजीकर (१८५२ मते), नवनाथ (प्रसाद) कांबळी (१८३० मते)  अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत.  
अरूण नलावडे हे प्रदीप कबरे पॅनलचे उमेदवार होते. परंतु, या पॅनलने मोहन जोशी यांच्या पॅनलला पाठिंबा दिल्याने त्यांची गणना उत्स्फूर्त पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये करण्यात आली.  उर्वरित महाराष्ट्रातून जिंकलेल्या २२ उमेदवारांपैकी १७ जणांचा पाठिंबा मोहन जोशी यांना आहे असे समजते.