05 March 2021

News Flash

रस्ते वापराचे शुल्क माफ?

स्थायी समितीत ताज हॉटेलला सवलत देण्याचा प्रस्ताव

स्थायी समितीत ताज हॉटेलला सवलत देण्याचा प्रस्ताव

मुंबई : गेट वे ऑफ इंडियाजवळील पंचतारांकित ताज हॉटेलने आजूबाजूचा रस्ता व पदपथ गेल्या ११ वर्षांपासून व्यापला असून या रस्त्याच्या वापरासाठी महापालिकेने जे शुल्क लावले आहे, त्यातून ताज हॉटेलला सवलत हवी आहे. रस्ते वापराचे ५० टक्के आणि पदपथाचे १०० टक्के शुल्क माफ करा, अशी मागणी ताजच्या व्यवस्थापनाने केली आहे. पालिका प्रशासनानेही तशी शिफारस केली असून स्थायीसमोर प्रस्ताव ठेवला आहे.

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्लय़ाच्या वेळी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने ताज हॉटेलवर हल्ला चढविला होता. या हल्लय़ात ३१ जणांचा मृत्यू झाला होता. परदेशी पाहुण्यांचे या हॉटेलमध्ये वास्तव्य असल्याने दहशतवाद्यांनी हे हॉटेल निवडले होते. त्यानंतर पोलिसांच्या निर्देशानुसार सुरक्षेचा उपाय म्हणून ताजच्या भोवतीच्या रस्त्यांवर झाडांच्या कुंडय़ा ठेवून अडथळे निर्माण करण्यात आले. तसेच याला जोडून असलेला पदपथ बंद करून अडवण्यात आला.

या हॉटेलच्या सभोवताली पी. जे. रामचंदनी मार्ग, बेस्ट मार्ग, बी. के. बोमन बेहराम मार्ग आणि महाकवी भूषण मार्ग हे रस्ते आहेत. या रस्त्यांवर कुंडय़ा ठेवून एकूण ८६९ चौरस मीटरची जागा अडवून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ९ जून २०१५ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या अडवलेल्या रस्त्याचे व पदपथाचे आवश्यक ते शुल्क वसूल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, रस्ते व पदपथाचा व्यावसायिक वापर करण्यात आलेला नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार ही जागा व्यापण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते वापराच्या एकूण शुल्कात ५० टक्के सवलत मिळण्याची मागणी हॉटेल व्यवस्थापनाने केली आहे.

महापालिका प्रशासनानेही रस्ते वापराचे ५० टक्के शुल्क आणि पदपथ वापराचे १०० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला आहे. मात्र आधीच टाळेबंदी व करोनामुळे पालिकेचे उत्पन्न घटलेले असून खर्च वाढलेला आहे. त्यामुळे पालिका ही सवलत देणार का, याकडे लक्ष लागले आहे. हा निर्णय घेतल्यास रस्ता आणि पदपथ आपल्या ताब्यात कायम राखण्याचा प्रयत्न ताज हॉटेलकडून सुरू राहील, असाही आरोप राजकीय वर्तुळातून होऊ लागला आहे. त्यामुळे स्थायी समितीत यावरून वाद रंगण्याची शक्यता आहे. रस्ते वापराचे केवळ ६६,५२,८०० रुपये भरल्यानंतर मासिक ५१, ९७५ रुपये निश्चित करून पदपथाच्या वापराचे शुल्क पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्ता, पदपथ असा व्यापला..

ताज हॉटेलने ८६९ चौरस मीटर इतके रस्त्याचे क्षेत्रफळ व्यापले आहे, तर ११३६.३ चौ. मी क्षेत्रफळाचे पदपथ पादचाऱ्यांच्या वापरासाठी बंद करण्यात आले आहे. रस्ता व्यापल्यामुळे पे अ‍ॅण्ड पार्कच्या धर्तीवर दर महिना ५१,९७५ रुपये या दराने जून २००९ ते जानेवारी २०२० करिता एकूण १ कोटी ३३ लाखांहून अधिक शुल्क लागू होते. त्याच्या ५० टक्के म्हणजे ६६ लाख ५२ हजार रुपये व्यवस्थापनाने आधीच भरले आहेत. उर्वरित शुल्क माफ करावे, अशी त्यांची मागणी आहे. तर पदपथ व्यापल्याबाबत शुल्क वसुलीचे निश्चित धोरण नसल्यामुळे त्याकरिता आकारलेले पावणेनऊ कोटींचे शुल्क १०० टक्के माफ करावे, अशी मागणी व्यवस्थापनाने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:14 am

Web Title: taj hotel needs tax rebate for the use of the road by the bmc zws 70
Next Stories
1 पर्ससीन मासेमारीचे परवाने रद्द?
2 काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची भूमिका दुटप्पी – फडणवीस
3 ‘लोकसत्ता नवदुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी 
Just Now!
X