लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर हात उचलणे चुकीचे असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी विधान भवनात पोलिस अधिकाऱयाला झालेल्या मारहाणीत आमच्या पक्षाचा आमदार दोषी असेल, तर त्याच्यावर कारवाई करा, अशी प्रतिक्रिया नोंदविली. 
मनसेचे विधीमंडळातील गटनेते बाळा नांदगावकर यांनी या संपूर्ण प्रकरणावरील राज ठाकरे यांची प्रतिक्रिया पत्रकारांना सांगितली. राम कदम यांना पक्षाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान भवनाच्या आवारात मंगळवारी सकाळी काही आमदारांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली होती. त्यामध्ये मनसेचे आमदार राम कदम यांचाही समावेश होता. राज ठाकरे सध्या पक्षाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार विदर्भाच्या दौऱयावर आहेत. तेथून त्यांनी नांदगावकर यांच्याकडे घडलेल्या प्रकाराबद्दल फोनवरून आपली प्रतिक्रिया नोंदविली.