तळोज्यात भटक्या कुत्र्यांनी एका मुलीचा चावा घेऊन बळी घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर, राज्यातील सर्वच भागांमध्ये भटक्या कुत्र्यांना आवरा, अशी आग्रही मागणी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बुधवारी विधानसभेत केली.
पुण्यातील ससून रुग्णालयात कुत्रा चावल्यावर देण्यात येणारी लस उपलब्ध नसल्याबद्दल संग्राम थोपटे (काँग्रेस) यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत उभय बाजूच्या सदस्यांनी ‘आधी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करा’, अशी मागणी केली. दाऊद, छोटा राजन किंवा गवळी यांची जेवढी दहशत नाही तेवढी भटक्या कुत्र्यांची दहशत असल्याचे जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) यांनी खोचकपणे सांगितले. मुंबईत रात्री-अपरात्री भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत असते. महापालिकेच्या वतीने या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी केली जाते व परत तेथेच आणून सोडले जाते. पण हे कुत्रे लोकांवर हल्ले करतात, असे डॉ. भारती लव्हेकर (भाजप) यांनी निदर्शनास आणून दिले. तळोज्यातील घटना भयंकर असून, त्याचा बोध घेऊन शासनाने कारवाई करावी, अशी मागणी लव्हेकर यांनी केली. माणूस की कुत्रे यापैकी कोणाला शासन महत्त्व देणार या विरोधकांच्या प्रश्नावर, सर्वसामान्य माणसाला प्राधान्य राहील पण प्राण्यांवर अन्याय करणे चुकीचे ठरेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध होत नाही, असे हर्षवर्धन सकपाळ (काँग्रेस) यांनी सांगितले.