मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका
पोलीस अथवा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यास माझा पहिल्यापासून विरोध आहे. विधानसभेत आमदारांनी एका पोलीस अधिकाऱ्याला मारल्याची घटना संतापजनक असून यात दोषी असणाऱ्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी कठोर कारवाई करावी, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.
शासकीय अधिकाऱ्यांची चूक असो अथवा नसो, कोणत्याही कारणासाठी त्यांना मारहाण करणे ही आक्षेपार्ह आणि संतापजनक गोष्ट असल्याचे सांगून पक्षपातळीवर या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे राज यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत आज मनसे आमदार राम कदम यांच्यासह शिवसेना व अपक्ष आमदारांनी एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली.
नागपूर येथे असलेल्या राज यांना विधिमंडळातील घटनेची माहिती समजताच त्यांनी मनसेचे गटनेते बाळा नांदगावर यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. त्यानुसार आमदार नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमे व विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे राज यांची भूमिका स्पष्ट केली.