करोनावरील उपचारातील ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने (सीडीएससीओ)राज्यांच्या औषध प्रशासनाला परिपत्रकाद्वारे दिले आहेत. देशभरात याचा तुटवडा असल्याने ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे आदेश दिलेले आहेत.

या इंजेक्शनच्या आयातीसाठी काही कंपन्यांना परवानगी दिली आहे. तसेच भारतातील तीन कंपन्यांना निर्मितीची परवानगीही दिलेली आहे. मात्र तरीही देशभरात अनेक ठिकाणी ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

‘लोकल सर्कल’ या संस्थेने याबाबत केलेल्या सव्‍‌र्हेक्षणात देशातील २३३ जिल्ह्य़ांमधील ८३२९ नागरिकांनी सहभाग घेतला होता. यातील ९३ टक्के ग्राहकांनी याचा काळाबाजार होत असल्याचे नमूद केले. औषध प्रशासनाने यावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मांडले आहे. हेट्रो हेल्थकेअरच्या इंजेक्शनची किंमत ५४०० रुपये प्रतिकुपी असून अगदी १५ ते ६० हजारापर्यत ज्यादा दराने विक्री केल्याची तक्रार संस्थेने सीडीएससीओकडे केल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच असे आढळल्यास थेट कारवाई करून कळविण्याचे पत्रकात स्पष्ट केले आहे.