आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणी झाल्यानंतर थेट विमान प्रवेश करण्याच्या जागेत असलेल्या अपोलो फार्मसीच्या दुकानात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे मोठय़ा प्रमाणात विकली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या पाहणीत आढळल्याने दुकानावर कारवाई करण्यात येणार आहे.

गेट क्रमांक ६९ जवळील दुकानात खरेदी केलेल्या औषधांच्या बिलांचे तपशील तसेच विक्री केलेल्या ग्राहकांचेही तपशील नव्हते. कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय अल्प्राझोलम टॅब, लोरॅझेपाम, डाएझेपाम अशा गुंगीच्या औषधांचीही विक्री दुकानात सुरू होती.

परदेशात जाणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने ही औषधे त्रासदायक ठरू शकत असल्याने तसेच परदेशात र्निबध असलेली औषधे सापडल्यास देशाच्या प्रतिमेस बाधा येण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर कारवाई करण्यात येणार असून हे दुकान सुरक्षा तपासणीआधी हलवण्यात यावे, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाने संबंधितांना केली आहे.