‘करोना’चा फटका बसल्यानंतर बदललेल्या जगण्यातील इतर समस्यांबरोबरच शालेय शिक्षणात निर्माण झालेल्या अडचणी कशा सोडवणार, हा मोठा प्रश्न सध्या पालक आणि शिक्षकांसमोर आहे.

शासनाने यावर ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा पर्याय घोषित केला असला तरी त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी ‘ऑनलाइन शाळा, ऑफलाइन शिक्षण’ या विषयावर ‘चतुरंग चर्चे’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी, ६ जुलै रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वेबिनारच्या माध्यमातून होणाऱ्या या परिसंवादात शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांचा प्रमुख सहभाग असणार आहे. ‘ऑनलाइन शिक्षणाचे फायदे-तोटे’ या विषयावर चर्चा होणार असून ‘ऑनलाइन’ शिक्षणामागची सरकारची भूमिका नेमकी काय आहे, शाळांची भूमिका कशी असेल आणि या बदलाविषयी पालकांना काय वाटते, यावर प्रकाश टाकला जाईल. ऑनलाइन शाळा सुरू झाल्यास प्रत्येकाच्या घरी इंटरनेट कसे पोहोचेल, या प्रश्नापासून घरून अभ्यास करणारी मुले खरोखरच गांभीर्याने तो करू शकतील का, नेमका अभ्यासक्रम काय असणार, वेळ काय असेल, तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण, गृहपाठ तपासणे, परीक्षा घेणे याविषयीच्या पालकांच्या प्रश्नांना मान्यवर उत्तरे देतील.

वक्ते.. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, ‘अक्षरनंदन’ शाळेच्या शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन, शैक्षणिक अभ्यासक श्रुती पानसे या परिसंवादात सहभागी होणार आहेत.

सहभागी  होण्यासाठी.. https://tiny.cc/LS_ChaturangCharcha_6July  येथे नोंदणी आवश्यक