आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा पुरेसा अनुभव पाठीशी नसतानाही तिने मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या तोडीस तोड कामगिरी करताना भारतीय महिला गटात जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. अशा या ‘मॅरेथॉन राणी’ ललिता बाबरशी मुक्त संवादाचा कार्यक्रम उद्या, मंगळवारी दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात रंगणार आहे. निमित्त आहे लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या २७ व्या पर्वाचे.
वेगवेगळ्या क्षेत्रात धडाडीने काम करून स्वतचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्त्ववान स्त्रियांशी संवाद साधून त्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी या उद्देशाने लोकसत्ताने व्हिवा लाउंज हा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये ललिताच्या रुपाने आंतरराष्ट्री धावपटू प्रेक्षकांना भेटणार आहे. केसरी प्रस्तुत आणि दिशा डायरेक्टच्या सहकार्याने होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपिया आणि केनियाच्या महिला धावपटूंना कडवे आव्हान निर्माण करणाऱ्या ललिता बाबरने २०१४मध्ये जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. या तिन्ही सत्रात तिने कामगिरीचा आलेख चढा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात की काही अंशी यशस्वीही झाली. २०१५मध्ये तिला अपयश आले असले तरी आशियाई अजिंक्यपद आणि जागतिक अजिंक्यपद तिने हे अपयश पुसून टाकले. या दोन्ही स्पर्धामध्ये तीने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. अशा मैदानी स्पर्धा गाजवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाशी गप्पा मारण्याची, तिचा प्रवास जाणून घेण्याची संधी मंगळवारी मिळणार आहे.

कधी – मंगळवारी, ८ सप्टेंबर
वेळ – संध्याकाळी ४.४५ वाजता
कुठे – स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.)
प्रवेश – विनामूल्य (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर)