बनावट पदवी, बनावट हजेरी, उपचारांमधील निष्काळजी, कोऱ्या अहवालावर सह्य़ा, गर्भलिंगनिदान, जाहिराती अशा आरोपांखाली तक्रार दाखल झालेल्या ३० डॉक्टरांवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल) निलंबनाची कारवाई केली आहे. चेन्नई वैद्यकीय महाविद्यालयात बनावट हजेरी लावणाऱ्या महाराष्ट्रातील ११ डॉक्टरांचा यात समावेश आहे.
बायोप्सी अहवाल येण्याची वाट न पाहता रुग्णावर कर्करोगासाठी शस्त्रक्रिया करण्याचा आरोप असलेल्या डॉ. नितिन राहणे यांच्यावर दोन वर्षांची निलंबनाची कारवाई तर कोणतीही पदवी नसताना स्टेमसेल्ससाठी तीन लाख रुपये शुल्क घेणारे डॉ. सुनिल वाघमारे यांच्यावर पाच वर्षे निलंबनाची कारवाई एमसीआयने केली आहे. जाहिराती करणाऱ्या सात डॉक्टरांना समज देणारी पत्रे पाठवण्यात आली आहेत. किंगपिन या बेटावरील एका महाविद्यालयाच्या नावाने बनावट पदवी देणाऱ्या डॉ. संग्राम जाधव यांचे तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आले असून त्यांना या कामात मदत करणाऱ्या डॉ. संजय परब यांचे तीन महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले. गर्भलिंगनिदानाबाबत २८ डॉक्टरांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील ८ डॉक्टरांवर निलंबन तसेच समज पत्र देण्याची कारवाई करण्यात आली असून उर्वरित डॉक्टरांसाठी सुनावणी सुरू ठेवली आहे, अशी माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे कार्यकारी सदस्य डॉ. रवी वानखेडकर यांनी दिली.
चेन्नई वैद्यकीय महाविद्यालयात केवळ प्राध्यापकांची अपेक्षित संख्या दाखवण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या महाराष्ट्रातील ११ डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत भारतीय वैद्यकीय परिषदेने कळवले होते. त्यावर गुन्हा अन्वेषण विभागानेही चौकशी केल्यानंतर या सर्व डॉक्टरांवर पाच वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली.