दक्षिण मुंबईतील ‘कांदळवन संरक्षण विभागा’ची आतापर्यंतची मोठी कारवाई

उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवित कफ परेड येथील गणेश मूर्ती नगर भागातील कांदळवनांवर अतिक्रमण करणाऱ्या झोपडय़ांवर कांदळवन संरक्षण विभागाकडून दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीही कारवाई करण्यात येत आहे. वनखात्याच्या कांदळवन संरक्षण विभागाने पाडकामाची ही कारवाई सुरू केली असून दक्षिण मुंबईतील ही आजवर करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई आहे.

उच्च न्यायालयाने २००५ साली दिलेल्या निर्णयानुसार कांदळवन क्षेत्राला धक्का पोहचवून ५० मीटरच्या आत बांधकाम करणे बेकायदेशीर आहे. तसे केल्यास १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत बांधकामांवर कारवाई केली जाते. मुंबईतील कांदळवन क्षेत्रांचा विचार केला असता ती क्षेत्रे वन विभाग, म्हाडा आणि जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येतात. दक्षिण मुंबईतील कफ परेड येथे गणेश मूर्ती नगर भागात किनाऱ्यालगतच्या कांदळवनांवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने केली जात होती. अखेरीस कांदळवन संरक्षण विभागाने बुधवारपासून या संपूर्ण पट्टय़ातील अतिक्रमण केलेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. बुधवारी केलेल्या कारवाईमध्ये १५० बेकायदेशीर झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच गुरुवारी २२५ झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी राहिलेल्या २०० ते २५० झोपडय़ावर कारवाई करण्यात येणार आहे.

कांदळवन संरक्षण विभागाच्या २० अधिकाऱ्यांसोबत ५० पोलीस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी कारवाई दरम्यान उपस्थित होते. ज्याठिकाणी भरतीचे पाणी कांदळवनात शिरते त्याठिकाणी झोपडय़ा उभारण्यासोबतच सिमेंट-विटांचा राडारोडा टाकला जात निदर्शनास आले होते. त्यामुळे कांदळवन नष्ट होण्याची भीती होती.

आधी रस्ता मग मोहीम

अतिक्रमण झालेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्याबरोबरच आम्ही खाडीनजीक असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी पाडकामाची अवजड साधनसामुग्री नेण्यासाठी सर्वप्रथम रस्ताची निर्मिती केली, असे कांदळवन संरक्षण विभागाचे अधिकारी मकरंद घोडके यांनी सांगितले. या कारवाईत अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामेही पाडल्याचे घोडके यांनी सांगितले.