राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या तमाशा जीवन गौरव पुरस्कारासाठी गंगारामबुवा कवठेकर यांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
५ लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २० फेब्रुवारीस वाशी-नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या तमाशा महोत्सवात कवठेकर यांना गेल्या वर्षीचे जीवनगौरव पुरस्कारप्राप्त गौरवमूर्ती भीमाभाऊ सांगवीकर यांच्या हस्ते कवठेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कवठेकर हे उत्कृष्ट ढोलकीपटू आणि विनोदसम्राट (सोंगाडय़ा) म्हणून प्रसिद्ध आहेत. हार्मोनियम, संबळ, ताशावादन, नृत्य याही कला अवगत असणाऱ्या कवठेकर यांचा १९५२ ते १९८७ या कालावधीत स्वत:चा फड होता.
त्यांचा तमाशा फड पुणे, अहमदनगर, नाशिक या भागात लोकप्रिय होता. ८४ वर्षे वयाचे कवठेकर बुवा आजही नव्या कलाकारांना मार्गदर्शन करत असतात.