News Flash

बाजारगप्पा :  तांबा-पितळय़ाचा ४०० वर्षांचा इतिहास

भट्टीत तांबे वितळवून त्याच्या पट्टय़ा पाडल्या जात आणि त्या पट्टय़ा जोडून भांडी तयार केली जात असे.

बाजारगप्पा :  तांबा-पितळय़ाचा ४०० वर्षांचा इतिहास

मुंबईत तांब्या आणि पितळेच्या विविध वस्तू होलसेलमध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भुलेश्वरजवळील तांबा काटा बाजार. या बाजाराला सुमारे ४०० वर्षांचा इतिहास आहे. पण आता हा बाजार पूजेकरिता लागणाऱ्या भांडय़ांच्या विक्रीपुरता उरला आहे.

भुलेश्वर परिसरात छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने उभे राहिल्यावर उजव्या हाताला लाकडाची संरचना असणारी १५० खोल्यांची इमारत दिसते. इमारतीच्या तळमजल्याला तांब्या-पितळेच्या वस्तूंची दुकाने आहेत. हाच मुंबईतील प्रसिद्ध तांबा-काटा बाजार. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या इमारतीत ब्रिटिश सैनिक राहात होते. त्यानंतर ही इमारत आवाभाई पारसी इस्टेट या संस्थेच्या हाती गेली. सुरुवातीला तळमजल्यावर व्यवसाय करणारी कुटुंबे या इमारतीत राहात होती. मात्र काही वर्षांनंतर ही कुटुंबेही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. त्यानंतर या इमारतीतील गाळे व्यावसायिक कारणांकरिता वापरले जाऊ लागले. इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे ५० ते ६० तांबे-पितळेच्या वस्तूंची दुकाने आहेत. पूर्वीच्या काळी भुलेश्वर भागात तांब्या-पितळेची भांडी तयार करण्याच्या ६ ते ७ भट्टय़ा होत्या. बंगालमधून आलेले कारागीर या भट्टय़ांमध्ये काम करीत. भट्टीत तांबे वितळवून त्याच्या पट्टय़ा पाडल्या जात आणि त्या पट्टय़ा जोडून भांडी तयार केली जात असे. या भट्टीमधून निघणारा धूर हा विषारी असल्याकारणाने येथील रहिवाशांच्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या भट्टय़ा बंद करण्यात आल्या. सध्या मात्र येथे एकच बंद स्वरूपातील भट्टी अस्तित्त्वात आहे. या भट्टय़ांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांना कंसारा म्हणतात. त्यांच्यावरूनच या भागाला कंसारा चाळ म्हणून ओळख मिळाली.

पूर्वी घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी, पाणी पिण्याचे भांडे इथपासून ते चहा पिण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी तांबे-पितळेच्या भांडय़ांचा वापर केला जाई. मात्र या भांडय़ांना वेळोवेळी कल्हई करावी लागत असे. हे काम फार कटकटीचे होते. या भांडय़ांचा स्वयंपाकघरातील वापर कमी होण्याचे हेदेखील महत्त्वाचे कारण होते. कल्हई करण्यासाठी प्रथम भांडे गरम करावे लागते. त्यानंतर अ‍ॅसिडच्या साहाय्याने हे धुतले जाते. धुतल्यानंतर १५ मिनिटे एका गरम सळईच्या साहाय्याने या भांडय़ाच्या आतील भागात रेघोटय़ा ओढल्या जातात. पुन्हा हे भांडे गरम केले जात. कल्हईचे काम करणाऱ्या कारागिरांना ‘भोई’ म्हणत. त्यामुळेच भोईवाडा हे नाव पडले.

तांबा-काटा बाजारात ‘रतल’ या मापाने ही भांडी मिळत. सध्याचे ४५० ग्रॅम म्हणजे तेव्हाचे १ रतल असे. रतल या मापानंतर शेर आले. आताचे ५०० ग्रॅम म्हणजे तेव्हाचे १ शेर. तांबे आणि पितळ हे सर्वाधिक महाग धातू आहे. आजही या बाजारात ६५० रुपये किलो तांबे, ४५० रुपये किलो पितळ, ३०० रुपये किलो अ‍ॅल्युमिनिअम आणि १५० रुपये किलो स्टील असा भाव आहे. स्टीलला मागणी वाढल्याने आणि तुलतेत ही भांडी स्वस्त असल्याने या बाजाराचे नाव जरी तांबा-काटा असले तरी ७० टक्के माल स्टीलच्या भांडय़ांचा आहे. अर्थात धार्मिक कार्यात तांब्यांच्या भांडय़ांना महत्त्व असल्याने येथे तांब्या, ताम्हण, अभिषेक पात्र, निरांजन, समई, घंटा, टाळ आदी पूजेकरिता म्हणून लागणाऱ्या भांडय़ांना आजही मागणी आहे. याशिवाय समारंभात जेवण तयार करण्यासाठी लागणारी मोठी तांब्याची भांडी विकत घेण्याकरिता कॅटर्स मालकांची रांग असते. मोठय़ा उपाहारगृहांमध्ये पदार्थ वाढण्यासाठी या भांडय़ांचा वापर केला जातो. ही भांडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात होलसेल दरात वस्तू मिळतात. यात विविध प्रकारचे चमचे, ताट, वाटय़ा, डबे, पेले, पातेले, कढई, तवा, परात, चहाचं पात्र, तेल-तुपाचं भांडं, कलाकुसर केलेले माठ, चमचे आणि कपबशा ठेवायचे स्टॅण्ड, नॉनस्टिक भांडी, तांब्याचं कोटिंग असणारे िपप आणि पातेली अशा असंख्य वस्तू पाहायला मिळतात. इतकंच नव्हे तर काचेची ताटे, चमचे, मग, किटली, थर्मास, प्रेशर कुकर, पॅन, हॅण्ड ग्राइंडर, विजेवर चालणारी शेगडी, जेवण गरम ठेवणारी भांडी अशा विविध वस्तू मिळतात. हल्लीच्या भांडय़ांना वजनच नसते, ही गृहिणींकडून नेहमी ऐकावयास मिळणारी तक्रार. पण इथली बहुतांश भांडी ‘वजनदार’ असतात.

हा बाजार पाहात पाहात आपण पुढे शिवाजी महाराज चौकात येतो. तिथे ‘सुरती’ नावाचे एक जुने उपाहारगृह आहे. या चौकातील उजवीकडचा रस्ता भुलेश्वर आणि पांजरपोळकडे जातो. तर डावीकडचा रस्ता मुंबादेवी मंदिराकडे जातो. या दोन्ही रस्त्यांवर पोटपूजेसाठी छोटी दुकाने आहेत. पांजरपोळ भागातही सुमारे ४० ते ५० तांबे-पितळेच्या वस्तूंची दुकाने आहेत. तांबे-पितळेच्या वस्तू घेण्यासाठी आलेला ग्राहक तांबा काटा बाजार आणि पांजरपोळ बाजारात फिरून खरेदी करतो. सोमवार ते शनिवार हा बाजार सुरू असतो. मात्र रविवारी या बाजाराला सुट्टी असते. काही दुकाने सुरू असल्यामुळे खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक रिकाम्या हाती जाणार नाहीत. १९६२ साली नाशिक, पुणे या भागांतून भांडय़ांच्या खरेदीसाठी ग्राहक मोठय़ा प्रमाणात येत असत. तेव्हा तांबा काटा बाजारातील दुकानदारांनी १० रुपयांवर एक टांगावाला लावला होता. हा टांगावाला तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनसमधून दूरवरून आलेल्या ग्राहकांना या बाजारापर्यंत आणून सोडत असे, असे या भागातील भांडय़ांच्या दुकानाचे मालक सुहास पारेख यांनी सांगितले. पारेख यांची पाचवी पिढी हे दुकान चालवीत आहे. वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा या चारही पिढय़ांचे फोटो त्यांनी या दुकानात लावले आहेत. गिरण्या सुरू असताना कामगारांची संघटना दर सणाला येथून कामगारांना देण्यासाठी भेटवस्तू घेऊन जात, असे पारेख सांगतात.

या दुकानांचे मालक बहुतेक कच्छी गुजराती समाजातील आहे. दुकान पिढय़ान्पिढय़ा एकाच कुटुंबाकडे असल्याने आजही पारेख फक्त आठ हजार रुपये भाडे दुकानाकरिता देतात, तर नवीन दुकानदाराला या जागेसाठी ७५ हजार रुपये मोजावे लागतात. सध्या अनेक दुकानदारांनी पुढची पिढी भाडय़ांचा व्यवसाय करण्यास उत्सुक नसल्याने त्यांनी या दुकानावरील आपला हक्क सोडला आहे.

मुंबईत ही भांडी तयार करण्याचा कारखाना नसल्यामुळे दिल्ली, मद्रास, अहमदाबाद, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून तांबे-पितळेची भांडी मागविली जातात. मुंबईत कारखाने अस्तित्त्वात होते तेव्हा येथेच ही भांडी तयार केली जात. मात्र कारखाने बंद झाल्यानंतर या भांडय़ांची आयात करावी लागली. भारतात स्टीलचा वापर प्रथम रेल्वेच्या डब्यातील हात धुण्याच्या बेसिन आणि स्वच्छतागृहात कमोड म्हणून करण्यात आला. आता स्वयंपाकघरातही स्टीलने स्थान मिळविले आहे. त्याच स्टीलने सध्या तांबा-काटा बाजारही ताब्यात घेतला आहे.

अस्सल तांबे-पितळ अभावानेच

तांबा काटा बाजार हा प्रामुख्याने तांबे आणि पितळेच्या भांडय़ांसाठी ओळखला जात असला तरी सध्या येथे मिळणारी भांडी ही अस्सल तांबे किंवा पितळीची असेल याचा शाश्वती नसते. कारण अस्सल तांबे आणि पितळेची भांडी ही वजनाने जड असतात आणि हवेशी संपर्क आल्यास या भांडय़ांचा रंग काळपट होतो. मात्र या दुकानात तांब्याची भांडी ही बाहेरून चकाकणारी दिसली तरी वजनाने हलकी असतात. तांबे ६५० रुपये किलो असून एक हंडा बनविण्यासाठी २ ते ३ किलो तांबे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 12:12 am

Web Title: tamba kanta bazaar copper brass commodities copper brass
Next Stories
1 मतदान आवाहनाच्या नावाखाली समाजमाध्यमांतून प्रचाराच्या क्लृप्त्या!
2 लाचेपोटी सोन्याची नाणी, प्रॉमिसरी नोट निश्र्च्लनीकरणानंतरची क्लृप्ती
3 प्रचारातील ‘आवाजा’चा तपशील द्यावा लागणार
Just Now!
X