पदपथावर झोपलेल्या मजुराचा टँकरच्या चाकांखाली येऊन गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची घटना वाकोल्यातील ग्रँड हयात हॉटेलजवळ मंगळवारी रात्री घडली. वाकोला पोलिसांनी टँकर चालकाला अटक केली असून टँकर मागे घेत असताना मजूर न दिसल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ग्रँड हयात हॉटेलजवळ असलेल्या कल्पतरू इमारतीजवळ मजुरांना झोपडय़ा बांधून देण्यात आल्या आहेत. या झोपडय़ांच्या जवळ मोहम्मद हरुन मोहम्मद सेहवान खान याने पाण्याचा टँकर उभा केला होता. उभ्या असलेल्या टँकरच्या जवळील पदपथावर सुभाष गोरे हा मजूर झोपला होता.

मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास मोहम्मद खानने टँकर सुरू केला आणि थोडा मागे घेत असताना  त्याला पदपाथवर झोपलेला मजूर दिसला नाही. टँकरचे एक चाक मजूर सुभाष गोरे याच्या दोन्ही पायांवरून गेले आणि तो जबर जखमी झाला. झोपडय़ांतील रहिवाशांनी मजुराच्या किंकाळ्या ऐकून त्याला सांताक्रूझच्या व्ही. एन. रुग्णालयात नेले, मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. वाकोला पोलिसांनी मोहम्मद खानला अटक केली आहे  असून टँकर ताब्यात घेण्यात आला आहे.