राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरुवात होणार असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शेळ्या मेंढय़ांसाठीची राज्यातील पहिली चारा छावणी सांगोला तालुक्यात सुरू झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

दुष्काळ निवारणासंदर्भातील उपाय योजना सुचविण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवारी मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, कृषी सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन मंत्री किशोरराजे निंबाळकर या वेळी उपस्थित होते. बैठकीत आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. सध्या राज्यात १५८३ चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण १० लाख ६८ हजार ३७५ जनावरे आहेत. आतापर्यंत राज्यातील ४९२० गावे व १० हजार ५०६ वाडय़ांना ६२०९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात १७ जूनपर्यंत पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर जलयुक्त शिवारमुळे केलेल्या कामाच्या ठिकाणी पाणी साठण्यास सुरुवात होईल. राज्यातील दुष्काळी निधीचे वाटपही सुरू असून आतापर्यंत ६७ लाख ४७ हजार ८३५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ४४१९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.