AIB चा सर्वात प्रसिद्ध चेहरा आणि त्याचा सह संस्थापक तसंच सीईओ असलेला तन्मय भट याने त्याच्या पदांचा राजीनामा दिला आहे. गुरसिमरन खंबाही AIB मध्ये नसणार आहे. इंटरनेटवर सुरु झालेल्या #MeToo मोहिमेनंतर सोशल मीडियावर सातत्याने AIB ला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर या दोघांनीही AIB पासून फारकत घेतली आहे. AIB च्या एचआरने या संदर्भातले एक पत्र ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ज्यानुसार तन्मय भट आता एआयबीशी संबंधित नसेल आणि गुरसिमरन खंबा हा सक्तीच्या रजेवर गेला आहे.

काय आहे प्रकरण?
AIB चे सदस्य असलेल्या उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. उत्सव त्याच्या AIB तील महिला सहकाऱ्यांना अश्लील मेसेज पाठवत होता. तसेच महिलांसोबत उत्सवचे वर्तनही चांगले नव्हते. ऑस्ट्रेलियातील क्रूझवर झालेल्या एका शोषणाच्या घटनेला एका महिलेने वाचा फोडली होती. या महिलेसोबतच नाही तर काही अल्पवयीन मुलींसोबतही उत्सवने गैरवर्तन केल्याचेही तिने म्हटले होते. उत्सवने काय केले हे तन्मय भटला ठाऊक होते. पण त्याने CEO असूनही कोणतीही कारवाई केली नाही. तन्मयचे हे वर्तन बेजबाबदार आहे आणि ते दुर्लक्ष करण्यासारखे नाही असेही AIB ने म्हटले आहे.

AIB ने काय म्हटले आहे?
आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल आम्ही माफी मागतो. उत्सव महिलांसोबत गैरवर्तन करतो आहे हे जेव्हा समजले त्याचवेळी आम्हाला कायदेशीर कारवाई करायला हवी होती. प्रायव्हसीचा मुद्दा सांभाळून आम्ही हे प्रकरण कोणालाही समजू दिले नाही. त्यामुळे आम्ही फ्री लान्सर म्हणून उत्सवसोबत काम करणेही बंद केले नाही. उत्सव चक्रवर्ती चुकीचे वागतो आहे याची माहिती आम्हाला काही वेळा मिळाली. मात्र याबाबत जास्त तपशील आमच्याकडे नाहीत. जे काही झाले ती आमची चूक आहे. आम्ही याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. आमचे सदस्य आणि फॉलोअर्स यांच्या वेदना आम्ही समजू शकतो. जे घडले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.