मुंबईला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण गेल्यावर्षीपेक्षा दीड महिना आधीच भरून वाहू लागले आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता धरण भरल्यावर धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यातून सुमारे १ हजारांहून अधिक क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. तानसा धरण परिसरात १ हजार ४८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी १४ जुलै रोजी केवळ ५२४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या वेळी ३२.५६ पाणीसाठा तलावात होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तानसा धरण भरून वाहू लागले होते. त्या वेळी तलाव परिसरात १ हजार ६०६ मिमी इतका पाऊस झाला होता. दरम्यान तानसा नदीलगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरण परिसरात १ हजार २०४ मिमी इतका पाऊस झाला असून तलावात ९४ टक्के पाणीसाठा आहे.